पुण्यातील 'त्या' अल्पवयीन मुलींची आत्महत्या की घातपात?
एबीपी माझा वेब टीम | 01 Oct 2016 07:48 PM (IST)
पुणे: पुण्याच्या भवानी पेठेतील कासेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तीन विद्यार्थिनींपैकी दोघींचे मृतदेह काल रात्री हाती लागले मात्र एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे या मुलींनी आत्महत्या केली की घातपात? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. श्रुती दिगंबर वाघमारे, वय 16 वर्षे अबेदा लुकमान शेख, वय 13 वर्षे मुस्कान इम्तियाज मुलतानी वय 14 वर्षे या तीन अल्पवयीन मुलींपैकी श्रुती आणि अबेदाचे मृतदेह सापडला आहे. मात्र मुस्कानचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या मुलींनी मुठा कालव्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला की त्यांच्यासोबत काही घातपात झाला? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण मुस्कानच्या मोबाईलवर मृत्यूपूर्वी तब्बल 40 फोन आले आहेत आणि त्यांनी ते उचलले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुलींशी मोबाईलवर बोलणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. मात्र, याप्रकरणी कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट नकार दिला आहे. श्रुती, अबेदा आणि मुस्कान भवानी पेठ परिसरातल्या कासेवाडी भागात राहतात. आबेदा आणि मुसकान आझम कँपसमधील अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये आठवी आणि नववीत शिकत होत्या, तर श्रुती रास्ता पेठेतील धनराज कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. प्रेम प्रकरणाची कुणकुण कुटुंबीयांना लागल्यामुळे मुलींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पण मुस्कानचा अजूनही शोध लागला नाही. त्यामुळे तिन्ही मुलींची आत्महत्या आहे की घातपात याचा तपास करणं आवश्यक आहे.