पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ति प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक्सप्रेसवेला शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जंगी मिरवणूक काढण्याची हिंमत या गुंडांमध्ये येतेच कुठून आणि पुण्यातील मध्यवर्ती भागात दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येचे पुरावे पोलीस न्यायालयात सादर का करू शकले नाहीत. पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय हे होणं शक्य नाही अशीच सर्वसामान्यांची या बाबतीतील भावना बनली आहे.


2014 साली पुण्यात झालेल्या दोन हत्यांच्या शिक्षा भोगत असलेल्या गजानन मारणेची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यांनतर मारणेच्या शेकडो समर्थकांनी पुण्याला येताना एक्स्प्रेसवेवर हैदोस घातला. ओपन कारमध्ये उभ्या असलेल्या गजानन मारणेच्या मागे-पुढे शेकडो गाड्यांचा ताफा होता. एवढंच नाही तर फटाके फोडत, आरडा-ओरडा करत आणि ड्रोनच्या साहाय्याने शुटिंग करत त्याच्या समर्थकांचा धिंगाणा चालू होता. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांना त्यावेळी कोणीही अडवलं नाही. हा ताफा पुढे निघून गेल्यावर पोलिसांनी एक्सप्रेसवेचे नियम मोडल्याबद्दल मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद केलाय. त्याचबरोबर अवैधरित्या उडवले जाणारे ड्रोन कॅमेरेही जप्त केले आहेत.


कोण आहे गजानन मारणे?


मागील अनेक दशकांपासून गजानन मारणे हे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, बेकायदा शस्त्रं बाळगणं असं अनेक गुन्हे मारणेवर नोंद आहेत. 2014 साली विरोधी टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्येच्या आरोपाखाली मारणेला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली होती. त्यातील अमोल बधेचा खून तर पुण्यातील नवी पेठेत पाठलाग करून धारदार शस्त्रांच्या साहाय्याने करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या थरारक घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती.


गजानन मारणेच्या स्वागतासाठी जमलेल्या त्याच्या समर्थकांमध्ये तरुणाईत नुकत्याच प्रवेश केलेल्या युवकांचं प्रमाण अधिक आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं अशाप्रकारे होणारं उदात्तीकरण या तरुणांची पावलं गुन्हेगारी विश्वाकडं वळण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या उद्दात्तीकरणाला जर वेळीच आळा घातला नाही, तर त्यातून असे अनेक गजानन मारणे निर्माण होण्याची भिती आहे. आणि तसं झाल्यास त्याला जबाबदार पोलिसच असणार आहेत.