पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयाच्या (Pune News) समोर असलेली आणि कर्क रोगाच्या रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची पाचशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीची सव्वा दोन एकर जागा अवघ्या 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः याला विरोध केला असून जागेच्या बदल्यात मिळणार असलेले 60 कोटी रुपये स्वतः देण्याची तयारी दर्शवली आहे.


विशेष म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं असून त्यापैकी एका कार्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं स्मारक असून विश्वेश्वरय्या त्यांच्या हयातीत पुण्यात (Pune News) असताना ते इथून त्यांचं कामकाज पाहायचे. मात्र एन जी व्हेंचर्स या खाजगी बिल्डरला ही जागा द्यायचं रस्ते विकास महामंडळाने ठरवलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही सव्वा दोन एकर जागा 26 वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाला भाडेतत्वार देण्यात आली होती.


मात्र, या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाची अनके कार्यालयं अनेक वर्षांपासून काम करत असून उरलेल्या जागेत कॅन्सर रुग्णांसाठीचा स्वतंत्र विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र शेकडो कोटी रुपयांची ही जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा हा डाव आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असता आपल्याला याबाबत काही माहितीच नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. तर रस्ते विकास महामंडळाचे मंत्री दादा भुसे या अभियंत्यांना अद्याप भेटलेलेलच नाहीत अशी माहिती आहे. 


ससून रुग्णालयासमोरील मोक्याच्या ठिकाणी असेलेली प्रशस्त सव्वादोन एकरची जागा रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निधी उभारणीच्या नावाखाली कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातल्याचं दिसून येत आहे. केवळ 60 कोटी रुपयांच्या बदल्यात तब्बल 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर ही जागा देण्यात येत आहे. 


रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव 


ससून रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले होते. त्या संदर्भात ससून रुग्णालय, प्रशासनाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाही देखील सुरू केली होती.