पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) पुणे दौऱ्याला काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसने जोरदार आंदोलन करून विरोध केला आहे. रविवारची सुट्टी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याचं कसं काय दाखवलं, असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. त्यासोबत पंतप्रधानांना काळ्या रंगाचं इतकं वावडं का आहे, असा सवाल ही राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला. यावरच आपली प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघते, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करतायेत.''


एबीपी माझाशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ''एखादं चांगलं काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत आणि दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची. देव त्यांना सुदबुद्धी देवो. तसेच अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्याना समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडली. मला यांच्या बुद्धीची कीव येते, हे दुर्दैव्य आहे, असेही ते म्हणाले आहेत. 


ते पुढे म्हणाले की, राज्यातील या सरकारला महाविकास आघाडी म्हणायचं की महावसुली आघाडी म्हणायची. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी बरेच लोक येत आहेत. मात्र याचं पूर्ण श्रेय फक्त मोदींचं असल्याचं ते म्हणाले. तसेच आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर भाष्य करत ते म्हणाले, ''आता हे वॉर्डाची रचना बदलत आहेत. काय-काय बदलायचं ते बदला, आम्हाला काहीच फरक पडत नाही. या जनतेच्या विश्वासावर आम्ही या महापालिकेत पुन्हा बसू.'' दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यात मेट्रोच्या दोन नवीन मार्गिकेचे उद्घाटन केले आहे. मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.   


महत्वाच्या बातम्या