पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी झालेल्या कारवाईवरुन आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेवरुन पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहे. ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांनी आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली,असा पोलीस कमिशनर आम्हाला नको.गुन्हा दडपण्याच्या "डिल" मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत,त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली आहे. ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे. 


'कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते. आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे.त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्या पासून करायला हवी.या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशनने कुणावरही कारवाई केलेली नाही,याचाच अर्थ असा होतो हा गुन्हा दडपण्याच्या "डिल" मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत,त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी,अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत आहे. या प्रकरणात पोलीस कमिशनर यांच्यावर संशय निर्माण अशा काही बाबी यात समोर आल्या आहेत.', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 


त्यासोबतच  फडणवीस दिशाभूल करत आहेत. पुण्यातील पब सुरुच आहेत तर ही घटना घडायची वाट बघत होते का? 2-3 व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले. सोबत असलेल्या मुलांचा एफआय़आऱमध्ये साधा उल्लेख नाही आहे. अधिकाऱ्यापासून ते कमिशनरपर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे, असे अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी पुणे पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे. 


धंगेकरांच्या ट्विटमधील मुद्दे कोणते?


1)इतक्या गंभीर प्रकरणात पहिली F.I.R दाखल करताना अक्षम्य अश्या चुका करण्यात आल्या आहेत,ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो. आरोपीने स्वतः सांगतोय मी दारू पिऊन गाडी चालवली तरी देखील कलम 185 लपवण्यात आले.तसाच प्रकार 304 कलम मध्ये सुद्धा केला.हे कलम जर अगोदर लावले असते तर परवाच त्याचा जामीन नाकारला असता व व्यवस्थेची इतकी बदनामी झाली नसती.


2)कुठल्याही अपघातात त्या कार मधील इतर व्यक्तींची चौकशी केली जाते ,या प्रकरणात इतर 2-3 व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले आहे.FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही.अर्थात यासाठी त्या मुलांचा पालकांकडून वेगळी डिल झाली आहे.


3) राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिल्या FIR पासून 304 कलम होता हे ठासून सांगितले प्रत्यक्षात पहिल्या FIR मध्ये त्याचा उल्लेख देखील नाही ,याचाच अर्थ पोलीस कमिश्नर यांनी गृहमंत्र्यांची देखील दिशाभूल केली आहे.


4) आज या घटनेचा 5 वा दिवस आहे.या घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले.सर्व व्यवस्थेची बदनामी झाली परंतु तरी देखील अद्याप कोणीही अधिकारी यात निलंबित नाही.याचा अर्थ तपास अधिकाऱ्यापासून ते कमिशनरपर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे.


5) काल अचानकपणे पुणे शहरातील 4 ते 5 पब आणि रूफटॉप रेस्टॉरंट वर कारवाई करण्यात आली. जर हे सर्व अवैद्य होतं तर ही घटना घडण्याची वाट का पाहिली..? पोलीस कमिशनर इतक्या दिवस त्यांच्या पाकिटावर मेहरबान होऊन त्यांना पब चालविण्याची मुभा देत होते का..?


पुणेकरांच्यावतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की ,विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची,पोलीस प्रशासनाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या पोलीस कमिशनर यांच्या बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे, त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय उत्तर देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 






इतर महत्वाची बातमी-


'मुलाने  कार मागितली तर त्याला चालवायला दे'; विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने कोर्टात सगळंच सांगून टाकलं!