Pooja Khedkar : पूजा खेडकर (Police) आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वादग्रस्त कारनामे आधीच जनतेच्या चर्चेचा विषय ठरले असताना, आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.
काय आहे प्रकरण?
शनिवारी सायंकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरच्या कारमध्ये अपघात झाला. या ट्रकमध्ये चालक चंदकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे होते, तर कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते. अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्याच वेळी, कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवून घेतले.
त्यांनी ट्रक आमच्या मागे आणा, असे चालकाला बजावले, मात्र काही अंतर गेल्यावर कार नजरेआड झाली. घाबरलेल्या ट्रक चालकाने घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली. ढेंगरेंनी तात्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.
पोलिसांचा तपास आणि खळबळजनक उलगडा
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात MH 12 RP 5000 क्रमांकाची कार पुण्यातील पूजा खेडकर यांच्या घरात उभी असल्याचे निष्पन्न झाले. त्वरित कारवाई करत नवी मुंबई पोलिसांची टीम खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरी पोहोचली. पोलिसांनी घरी पोहोचल्यावर खेडकर यांच्या आईने गेट उघडण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करत छाननी सुरू ठेवली. काही वेळाने खेडकर यांच्या घरातून ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याची सुटका करण्यात आली.
नवी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु
या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला? अपघातात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात कशी आली? अपघातातील दोघे आरोपी कोण होते आणि त्यांचा खेडकर कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे? या सर्व बाबींची चौकशी नवी मुंबई पोलीस करत आहे.
पूजा खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ
पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर याआधीही विविध वादग्रस्त प्रकरणांचे आरोप लागले आहेत. त्यामुळे या नव्या अपहरण प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत अधिक भर पडल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा