पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांनी तशा सूचना देण्यात आल्यात. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, अशी ग्वाही नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. सोबतचं जे आरोप करत आहेत त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करत या गोष्टीचं राजकारण करू नये असेही मत व्यक्त केलं.


काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
मृत्यू संशयास्पद झालेला आहे, यात कोणतीच शंका नाही. परंतु, पूजा चव्हाणच्या मृतदेहाचा पीएम रिपोर्ट अजून यायचा आहे. व्हायरल झालेल्या क्लिपबाबत व्हॉइस सॅम्पल पहावं लागणार आहेत. त्याचाही तपास होईल. कोणत्या पक्षाचा असा हा विषय नाही. पूर्ण तपास होईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य नाही. निःपक्षपातीपणे तपास होईल याची ग्वाही देते. त्यांना मंत्रीपदापासून दूर करायचं का नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील, असे म्हणत विरोधकांच्या मागणीवर नीलम गोऱ्हे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सोबतचं जे सरकारवर आरोप करत आहे, त्यांच्यापैकी एकानेही पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याची टीका गोऱ्हे यांनी केली. उगाच कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या आहेत.


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेला अरुण राठोड आहे तरी कोण?


वृत्ताकन करताना काळजी घ्या : गोऱ्हे
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही ऑडियो क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. यावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, की लीक होणाऱ्या माहितीच्या आधारे बातमी देताना काळजी घ्या. याआधीच्या प्रकरणात अशाच लीक माहितीवर बातम्या दिल्या गेल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची उदाहरणे आहे. या प्रकरणात असं होऊ नये त्यामुळे लीक माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची वरिष्ठांकडून खातरजमा करा, असा सल्लाही माध्यम प्रतिनिधींना गोऱ्हे यांनी दिला.


काय आहे प्रकरण?
23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.