पुणे : पुण्यातील नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी पुणे पोलिसांनी झडती घेतली. यावेळी त्याच्या घरातून मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने, कुलमुखत्यारपत्र, साठेखत अशा गोष्टी सापडल्या आहेत. बुधवारी (दि. १०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (दि. ११) पहाटे चारपर्यंत बंडू आंदेकरच्या घराची झडती सुरू होती. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आंदेकरने घराच्या शंभर मीटर परिसरात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पोलिसांनी सांगितले.

Continues below advertisement

५ सप्टेंबर रोजी बंडू आंदेकर याची मुलगी कल्याणी यांचा मुलगा आयुष कोमकर याच्यावरती गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी पोलिसांनी बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, वृंदावनी, स्वराज व तुषार (वाडेकर कुटुंबीय) यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून २१ हजार रोख, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली, तर टोळीचा म्होरक्या बंडू यांच्या घरातून ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची आजच्या बाजार भावानुसार ८५ लाखांहून अधिक किंमत आहे. ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली.

बंडू आंदेकरच्या घरात १० पेक्षा अधिक साठेखत, पॉवर ऑफ अॅटर्नी, बँकेचे पासबुक, एक कार, विविध करारनामे, टॅक्स पावत्या, पेनड्राईव्ह इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तब्बल ११ तास पोलिसांकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष कोमकरच्या खुनाचा तपास सुरू आहे. बुधवारी या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Continues below advertisement

२२ ऑगस्ट रोजी वनराज आंदेकर यांचे वर्षश्राद्ध; बदला घेण्याचा कट

वनराज आंदेकर यांचा खुनाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बंडू आंदेकर आणि त्याच्या घरच्यांनी २२ ऑगस्ट रोजी तिथीनुसार त्यांचे वर्षश्राद्ध केले होते. त्यानंतर ते केरळ येथे देवदर्शनासाठी गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

आंदेकरच्या घराची पहिल्यांदाच झडती

आयुष कोमकरच्या खून प्रकरणात मकोका कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी झडती घेण्यात आली आहे, या झडतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे.