Pune Crime News: पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये के.के. मार्केट व संविधान चौकात सुरु असलेल्या अवैध ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरु असलेल्या आठ जुगार अड्यांवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात 11 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तब्बल 94 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यासंदर्भातील पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचला आणि बनावट ग्राहक आणि पोलीस पथकासह जात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.


बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, के.के. मार्केट व संविधान चौक परिसरात माऊली एंटरप्राईजेस, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, लक्ष्मी ऑनलाईन लाॅटरी सेंटर, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस लाॅटरी सेंटर, श्री गणेश एंटरप्राईजेस लाॅटरी सेंटर, श्री गुरुदत्त एंटरप्राइजेस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात व दोन सार्वजनिक ठिकाणी बाहेर दुचाकीवर सुरू असलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे.


लाॅटरी मटका, कल्याण मटका, व्हिडिओ गेम्स,  व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत होते. मोबाईलचा वापर करुन ऑनलाईन लाॅटरी जुगार, कल्याण मटका  तसंच इतर प्रकारचे जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे यांच्यावर कारवाई केली.  इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


आओ चलो खिलाडी, खेल शुरु है बिबवेवाडी..!


गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून पुणे शहरातील अवैध धंद्यावर  सुरू असलेल्या धाडीं सत्रांमुळे काही ठिकाणी अवैध धंदे वाल्यांनी आपले धंदे बंद केले. पण बिबवेवाडीत ऑनलाईन लाॅटरीच्या नावाखाली बेसुमार जुगार सुरु होता‌. त्यामुळे इतर विभागातील खेळीसुद्धा त्या परीसरात जात होते.  याबाबत दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाकडून गेल्या आठवड्यापासून रेकी करण्यात आली होती. तिकडचे लाॅटरी जुगाराच्या मालकांनी खेळींना आकर्षित करण्यासाठी काही एजंट नेमले होते. ते खेळींना मेसेज पाठव होते, 'आ़ओ चलो खिलाडी, खेल शुरु है बिबवेवाडी..!', अशा प्रकारचे मॅसेज पाठवत होते.