पुणे : सरकारी कामात अडथळा आणणे तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे यांनी तक्रार नोंदविली होती.

सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक डमाळे यांनी  अवैधरीत्या रेशनिंगच्या गव्हाची वाहतूक करताना एक टेम्पो पकडला होता. तो टेम्पो जुन्नरचे मनसेचे आमदार सोनवणे यांचा कार्यकर्ता असलेल्या योगेश भोंडवेचा होता. त्यामुळे संतापलेल्या आमदार सोनवणेंनी पोलीस स्टेशनमध्ये येत हा टेम्पो सोडण्यात यावा यासाठी ज्योती डमाळे यांच्यावर दबाव आणला. तसेच त्यांना शिवीगाळही गेली. अशा आशयाची तक्रार ज्योती डमाळे यांनी केली होती. ज्यामुळे आता आमदार शरद  सोनवणेंवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

2014 साली झालेल्या निवडणुकीत शरद सोनवणे हे मनसेकडून निवडून आलेले एकमेव आमदार ठरल्याने त्यांचे नाव राज्यभर चर्चेत होते. मात्र आता या प्रकरणात त्यांच्यावर काय कारवाई होतेय, हे पाहणे महत्वाचे ठरेल.