पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) कंत्राटी चालकांनी अचानक संप पुकारल्यामुळे आता पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या खासगी कंपनीद्वारे कंत्राटी चालक पुरवले जातात, त्या प्रसन्न पर्पल कंपनीसोबतचा करारच तुकारम मुंढेंनी रद्द करण्याचं ठरवलं आहे.


चालकांना पुढे करुन प्रसन्न पर्पल ही कंपनी वेठीला धरत असल्याचा आरोप मुंढेंचा आहे. प्रसन्न पर्पल आणि पीएमपीएमएलमध्ये करार झाला आहे. ज्यानुसार चालकांचा पगार आणि बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी प्रसन्न पर्पल कंपनीची आहे. मात्र, कंपनी करार पाळत नसल्यामुळे मुंढेंनी मागच्या दोन महिन्यांपासून चालकांचे पगार रोखून धरले आहेत. त्यामुळे आज सकाळापासून पीएमपीएमएलचे चालक संपावर गेले आहेत.

आता पुण्यातील पीएमपीएमएल बसवरील खासगी बस ड्रायव्हर्सनी सकाळपासून कामबंद केल्याने 200 बसची वाहतूक थांबली. यामध्ये कोथरुड डेपोच्या 110, तर पिंपरीच्या 90 बसवरील चालकांचा संपात सहभाग आहे.

दरम्यान, नागरिकांना पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती पीएमपीएमएलने दिली आहे.

PMPML आणि प्रसन्न पर्पल कंपनीमधील करार काय आहे?

पीएमपीएमएल आणि प्रसन्न पर्पल कंपनी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासूनचा करार आहे. पीएमपीएमएलच्या 200 बस अशा आहेत. ज्यामध्ये कंडक्टर पीएमपीएमएलचे आहेत. मात्र ड्रायव्हर प्रसन्न पर्पल कंपनीचे आहेत. त्याचसोबत, डिझेल आणि मेन्टेनन्सची जबाबदारीही प्रसन्न पर्पलची आहे.