Pune Accident News: पुण्यातील चांदणी चोकात ट्रक आणि पीएमपी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं आहे. चांदणी चौकातील प्रथमेश इलाईट या बिल्डींगसमोर हा अपघात झाला. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. पुणे बॅंगलोर हायवेला मिळणाऱ्या रस्त्यावर अपघात झाल्याने बराच काळ हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. साताऱ्याला जाणारे आणि कोथरुड परिसरात येणारे नागरीक अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने खोळंबले होते.


दोन तास रस्ता बंद


सकाळी हा अपघात झाल्यामुळे ऑफिसला जात असलेल्या अनेक नागरिकांना मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. तब्बल दोन तास सगळे नागरीक खोळंबले होते. पुण्यातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, हिंजवडीकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या सगळ्या परिसरात आयटी कंपन्या असल्याने नागरीक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. सकाळी ऑफिसची वेळ असल्याने नेहमी या सस्त्यावर गर्दी असते. मात्र अपघातामुळे नागरीकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. रस्यांच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात मोठी जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. 


वारजे पोलीस दाखल


अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी वारजे पोलीस दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. वाहतुक संथ गतीने सुरु झाली आहे. मात्र अनेकांना पर्यायी रस्त्याचा वापर करा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


नवले पुलासारखी परिस्थिती
पुण्यातील नवले पुलावर कायम मोठे अपघात होत असतात. त्यामुळे नवले पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुलावरील अपघातांमुळे मोठी जीवित हानीसुद्धा होते शिवाय नागरीकांना त्रास देखील होतो. गेले अनेक वर्ष झाले पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघात होतात. मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचं चित्र आहे. अपघाताचं सत्र असंच सुरु राहिलं तर नागरीकांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका आहे.