PM Narendra Modi Visit Dagdusheth Temple : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी पुण्याचा लाडका बाप्पा श्रीमंत दगडूशेठ मंदिरात (Dagdusheth Temple) महाभिषेक केला आणि महाआरती केली. त्यावेळी त्यांना पुजा सांगणारे पुजारी मिलिंद राहुरकर भावूक झाले होते. एबीपी माझाशी बोलताना आपला अनुभव सांगितला. आजचा अनुभव अविस्मरणीय होता. सगळं पुणे मोदींची वाट बघत होते. मी त्यांना पुजा सांगितली. देशाच्या पंतप्रधानांना पूजा सांगण्याचं भाग्य मला मिळालं. माझे आनंद अश्रू थांबत नव्हते. ही सगळी बाप्पाची कृपा आहे, असा अनुभव त्यांनी शेअर केला.


लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान झाला. त्यापूर्वी त्यांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात हजेरी लावली. पुणेकरांच्या लाडक्या बाप्पाच्या चरणी मोदी लीन झाले होते. य़ावेळी दगडूशेठ मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते  दगडूशेठ गणपतीला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोदींची एक झलक पाहण्यासाठी मोदी गर्दी केली होती. बाप्पाच्या आरतीवेळी त्यांच्यासोबत विविध भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते.


ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी आणि मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांच्य़ासह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. 


मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा आणि महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची  परडी आणि सुकामेवा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, सौरभ गाडगीळ यांनी ही मूर्ती साकारली होती. 


हेही वाचा-


 PM Modi Pune visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन