PM Narendra Modi On Girish Bapat : खासदार गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजारने निधन झालं आहे. 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते , अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणि पुण्याने भाजपचा मातब्बर नेता गमावला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन श्रद्धांजली वाहिली जात आहे.
गिरीश बापट एक नम्र आणि कष्टाळू नेते- नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबत त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच विमानतळावरील फोटोदेखील शेअर केला आहे. गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते उत्कट होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे- मुख्यमंत्री
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
अत्यंत हजरजवाबी नेता भाजपने गमावला- देवेंद्र फडणवीस
गिरीश बापट यांचं निधन आमच्यासाठी धक्कादायक आहे. मागील काही दिवस ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. मात्र या आजारावर ते मार करतील अशी आशा होती. मात्र त्यांची आजाराशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. जनसामान्यांशी जुळलेला आणि जनीमीवरची माहिती असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. शेतीतदेखील त्यांना रस होता. अमरावतीत जाऊन ते कधीतरी शेतात रमायचे. अत्यंत हजरजवाबी नेता भाजपने गमावला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.