Narendra Modi on Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) तीन वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये नाशिक(Nashik), मुंबई (Mumbai) आणि सोलापूर (Solapur) दौऱ्यावर पंतप्रधान आले होते. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ते तीन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. आता फेब्रुवारीमध्येही ते तीन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामध्ये एक दौरा पश्चिम महाराष्ट्रात असेल तर दोन वेळा ते विदर्भात येणार असल्याचं समजतेय. मात्र, अद्याप या दौऱ्याबाबत निश्चिती नाही.


पुणे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी -


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचं बोलले जातेय. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रशासनाने तयारीही सुरु केली आहे. पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे.  शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


दोन वेळा विदर्भात येणार - 


फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळेला विदर्भाच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. 11 फेब्रुवारीच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीचे तिसऱ्या आठवड्यात नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती समोर आली आहे. 


भाजपच्या एससी सेल (SC Cell ) च्या देशभरातील सुमारे 25000 पदाधिकाऱ्यांचा खास मेळावा/सभा नागपुरात पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडी ( Cell ) च्या खास सभा वेगवेगळ्या शहरात घेण्याचे ठरवले आहे.. त्या अंतर्गत भाजपच्या अनुसूचित जाती आघाडी ही खास सभा नागपुरात होणार आहे. 


मागील महिन्यातही पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर  आले होते 


पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यातही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. आगामी निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक, मुंबई आणि सोलापूर येथे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मुंबईमध्ये अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं.