Sharad pawar and PM Modi : राज्यातील सत्तानाट्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar)हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहे. एकीकडे शरद पवारांच्या समर्थकांकडून आणि विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मोदींच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवून आणि आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत आहे.
या कार्यक्रमात राजकीय नेत्यांची मोठी फळी बघायला मिळणार आहे. मात्र यातच सगळ्यात जास्त लक्ष मोदी आणि शरद पवारांच्या उपस्थितीकडे लागलं आहे. विरोधक मोदींच्या विरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावर शरद पवार ठाम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
ज्यावेळी मोदींच्या विरोधात एकजूट दाखवण्यात येत होती. त्यावेळी शरद पवारदेखील मोदींच्या विरोधातील एकजुटीत होते. पाटणा आणि बंगळुरु या दोन ठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी मोदींना विरोध केला होता. आता पवार आणि मोदी एकत्र दिसत असल्याने राजकारणात वेगळच चित्र बघायला मिळत आहे.
आज राज्यसभेतलं मतदान होण्याची शक्यता होती. मात्र या मतदानाची वेळ शरद पवारांवर आली नाही. मतदान करायचं की मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं, असा पेच शरद पवारांसमोर निर्माण झाला असता. त्यावेळी शरद पवार नेमकं प्राधान्य कशाला देणार, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला असता.
इंडिया आघाडीत नाराजी...
एकीकडे शरद पवार इंडिया आघाडीकडून पंतप्रधांनांना विरोध करत असताना दुसरीकडे त्यांच्यासोबतच एकाच मंचावर दिसत असल्याने इंडिया आघाडीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र याच कार्यक्रमात शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यासोबतच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने त्यांच्यात काही टीका टिपण्णी केली जाते का? हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.
विरोधक मोदींना काळे झेंडे दाखवणार
देशाचं राज्य जळत असताना मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राज्य जळत असल्याने मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मागे हटणार नाही मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा-