PM Modi Pune :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. तसंच पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रोचा देखील समावेश आहे. सोबतच अनेक कार्यक्रमही नियोजित आहेत. या दौऱ्यामुळे पुण्यात आज वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहे.


याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले आहे. या पुरस्कार सोहळ्यात राजकीय नेत्यांची मोठी फळी उपस्थित राहणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट तसेच काही संघटनांचा विरोध आहे. गो बॅक मोदी म्हणत विरोधी पक्ष पुण्यात पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करणार आहेत. ज्या मंडई परिसरात आंदोलन केलं जाणार आहे, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शरद पवार कार्यक्रमात तर कार्यकर्ते मोदींच्या विरोधात आंदोलनात असतील. 


वाहतुकीत बदल -


पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. एक ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता ते दुपारी 3 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.


मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच!


देशाचं एक राज्य जळत असताना मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राज्य जळत असल्याने मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मागे हटणार नाही मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे. 


हेही पाहा-


<