होळी खेळताना स्कूल बसमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 01 Mar 2018 06:20 PM (IST)
बसमधून खाली पडल्यामुळे पिंपरीत नववीत शिकणाऱ्या राज कांबळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवड : धुलिवंदनाचा उत्साह शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. धावत्या स्कूल बसमध्ये होळी खेळणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं आहे. बसमधून खाली पडल्यामुळे पिंपरीत नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिंपरीतील मोझे स्कूलमध्ये शिकणाऱ्या राज कांबळेचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. शुक्रवारी धुलिवंदनाची सुट्टी असल्यामुळे आदल्या दिवशी शाळेतून घरी जाताना स्कूल बसमध्ये काही विद्यार्थी रंग खेळत होते. काही जण एकमेकांना रंग लावत होते, तर कोणी फुगा फेकून मारत होतं. धावत्या बसमध्ये होळी खेळताना राजचा पाय घसरला आणि तो थेट बसमधून खाली पडला. बसमधून पडून मार लागल्यामुळे राजचा मृत्यू झाला. होळी-रंगपंचमी खेळावी, मात्र खेळताना काळजी जरुर घ्यावी, असं आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.