Pimpri Hording collapses : पिंपरी चिंचवडच्या किवळेमध्ये जाहिरातीचे लोखंडी फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदोष मनुष्यवधाचा आणि अनधिकृत जाहिरात फलक लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. अद्याप यातील कोणीही रावेत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या चारही जणांचा शोध सुरु आहे.


पिंपरी- चिंचवडच्या रावेत भागात होर्डिंग कोसळलं होतं. होर्डिंग्जच्या खाली पंक्चरचे दुकान दबले गेले होते. त्यावेळी दुकानाजवळ सात ते आठ व्यक्ती होते. त्यातील 4 ते 5 जण दगावले आहेत. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना काल रात्री ही दुर्घटना घडली. पावसामुळं काही जणांनी पंक्चर दुकानाचा आडोसा घेतला होता. मात्र त्याचवेळी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळं होर्डिंग खाली कोसळलं आणि पंक्चर दुकानात असणारे होर्डिंगखाली दबले गेले. यावेळी दुकानात उपस्थित असणाऱ्यांना गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


हा सगळा प्रकार समजताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं. त्यासोबतच पोलीस, पालिका आणि आपत्ती व्यावस्थापनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.  होर्डिंग खाली किती लोक दबले गेले होते याचा अंदाज आला नव्हता. क्रेन आणि जेसीबीच्या माध्यामातून मदतकार्य सुरु करण्यात आले होते. यावेळी गॅस कटरने सगळ्या होर्डिंगच्या सळ्या कापण्यात आल्या. त्यानंतर होर्डिंगच्या मधोमध अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. 


रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरु 


या अपघातानंतर रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. यावेळी जिल्हाधिकारी, पालिका आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे  अधिकारी रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी हजर होते. त्यांच्यासोबतच मृतांचे नातेवाईक आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. आडोसा घेतलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


नातेवाईकांना मदत करण्याच्या कामाला प्राधान्य..


शोभा टाक, वर्षा केदारी,  भारती मंचक, अनिता रॉय, रामअवध आत्मज अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. तर विशाल यादव, रहमद अन्सारी, रिंकी रॉय ही जखमींची नावं आहे. या सगळ्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणं आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या कामाला प्राधान्य देत असल्याचं पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितलं आहे. या सगळ्या बचावकार्यासाठी आठ क्रेन  आणि तीन जेसीबींची मदत घेण्यात आली होती. त्यासोबतच इतर अग्निशमन दलाचे अधिकारीदेखील उपस्थित होते.