पिंपरी चिंचवड : सोसायटीची रेकी, कुलुप बंद फ्लॅटमध्ये प्रवेश अन् कपाट तोडून सोने चांदीचे दागिने लंपास. अवघ्या दहा मिनिटांत तेही दिवसा ढवळ्या झालेली ही घरफोडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या पुनावळे इथली ही घटना आहे. हा महातरबेज चोरटा नेहमीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो. म्हणूनच आता त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांना त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वेळ आली आहे.

पुनावळे येथील गगनगिरी सोसायटीत 6 सप्टेंबरच्या भरदुपारी हा चोरटा घुसला. दुपारचे दोन वाजून दोन मिनिटं झाली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने हातात एक कागद घेतला होता. जणू मोठ्या हुद्द्यावर नोकरीसाठी असल्याचा आव त्याने दाखवला. याच रुबाबात त्याने 'ए' विंगची रेकी केली, कुलूप बंद फ्लॅट नसल्याने तो दोन वाजून पाच मिनिटांनी रिकाम्या हाती लिफ्टने खाली उतरला. मग त्याने 'बी' विंग कडे मोर्चा वळवला, दुसऱ्या मजल्यावर वैभव वाघ यांचा 202 नंबरचा फ्लॅट कुलूप बंद अवस्थेत त्याला दिसला. त्याने त्या फ्लॅटचा कोयंडा उचकटला, घरात प्रवेश करुन कपाटाचे लॉक तोडले आणि त्यातील पिशव्या घेऊन तो अवघ्या काही सेकंदात बाहेर ही पडला. तिसऱ्या सीसीटीव्हीत दोन वाजून दहा मिनिट झाले होते, त्याच्या हातात दिसत असलेल्या पिशव्यांमध्ये सोने-चांदीचे दागिने आहेत. तरबेज आणि शांत डोक्याचा हा चोर घरफोडी करुन लिफ्ट मागायलाही धजावत नाही. पहिल्या आणि तिसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील वेळ पाहिली तर त्याने केवळ दहा मिनिटांत रेकी करुन हात साफ केल्याचं दिसतं.

या सराईत चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली. बिनधास्तपणे शहरभर वावरुन तो कुलूपबंद घरं अशाच प्रकारे फोडतो आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार ही होतो. म्हणून त्याला बेड्या ठोकण्यासाठी आता पोलिसांना सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला आहे. शहरातील व्हाट्सअॅप ग्रुपवर तसंच फेसबुकवर या तरबेज चोराचे फोटो व्हायरल करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.