पिंपरी चिंचवड : चाकणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येने वेगळे वळण घेतले आहे. नात्यातीलच 17 वर्षीय मुलाने हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. तृतीयपंथी चिडवते म्हणून या मुलाने हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, दाक्षिणात्य कंचना सिनेमा पाहून हत्या करुन पुरावे लपवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर चाकण पोलिसांनी आधी अटक केलेल्या तिघांना सोडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.


हत्या झालेली मुलगी ही हत्या करणाऱ्या मुलाची मावशी लागते. दोघांच्या वयात साम्य असल्याने लहानपणापासून ते एकमेकांना चांगले ओळखत होते, शिवाय थोपटवाडी या गावातच रहायला असल्याने एकमेकांच्या घरी येणं-जाणं ही सुरू होतं. हा अल्पवयीन मुलगा भारुडाचे कार्यक्रम करायचा आणि त्यात स्त्री पात्र करत असे. त्यामुळे मयत मुलगी त्याला तृतीयपंथी हावभाव का करतो, तसेच का हसतो असं म्हणून चिडवत असे. पण वारंवार असं घडत असल्याने तो संतापला होता. त्याची सहनशीलता संपलेली होती. अशातच तो क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया आणि दाक्षिणात्य कंचना पाहू लागला. तसेच ब्लू फिल्मचीही त्याला आवड होती. पण गुन्हेगारांचा छडा कसा लावला या दाखवल्या जाणाऱ्या मालिकेतून त्याने हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या अनेक कल्पना पाहिल्या. यातूनच तृतीयपंथी म्हणून हिणवणाऱ्या मावशीचा काटा काढायचं त्याने कट रचला.


24 जुलै रोजी घरी बहीण आणि दाजी येणार असल्याने अल्पवयीन मावशी स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू आणण्यात व्यस्त होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली. तीन किलोमीटर अंतरावरील किराणा मालाच्या दुकानातून ती साहित्य घेऊन, अल्पवयीन मुलाच्या घरातून मटकी घेऊन जाणार होती. हे त्या अल्पवयीन मुलाला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने मावशीच्या मार्गावरील ओढ्यालगतच्या निर्जनस्थळी एक दगड आणि झाडांची फांदी आणून ठेवली. किराणा मालाच्या दुकानातून आलेल्या मावशीच्या हातात त्याने मटकीचा डबा ठेवला आणि खुसकीच्या मार्गातून तो ओढ्यालगत पोहोचला. मावशी तिथे पोहचताच त्याने तिच्यावर हल्ला केला आणि जमिनीवर पाडले. ती ओरडेल म्हणून तोंडात बोळा घातला आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. मग मृतदेह खांद्यावर घेत एका झुडपात टाकला. तिच्यावर कोणीतरी अत्याचार केल्याचं भासवण्यासाठी तिला विवस्त्र ही केलं आणि पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिचे कपडे आणि मोबाईल किराणा मालाच्या पिशवीत भरुन दुसरीकडे लपवले. मग घरी जाऊन स्वतःचे कपडेही नजरेआड केले. नंतर अल्पवयीन मावशीचा शोध घेण्यासाठी तोही बाहेर पडला, बराच शोध घेतल्यावर अन्य एका नातेवाईकाला मृतदेह झुडपात आढळला.


त्याचवेळी हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाने घटनास्थळी न जाताच मृत मावशीच्या बहीण आणि भावाला तिची हत्या झाल्याचं सांगितलं. चौकशी वेळी ही बाब पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी अंत्यविधी पार पडू दिला आणि पुन्हा या अल्पवयीन मुलाची चौकशी केली, तेव्हा किराणा मालाच्या पिशवीत काय-काय होतं हे त्याला विचारलं. त्याने प्रत्येक वस्तूच नाव घेतलं, त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. तुला हे सर्व कसं काय माहीत, असा पोलिसांनी उलट प्रश्न विचारताच त्याची बोबडी वळली. तिथेच पोलिसांनी हत्येचा छडा लावला.


24 जुलै रोजी काय घडलं होतं?
थोपटवाडी येथील 17 वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. 24 जुलै रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास किराणा माल आणण्यासाठी ही मुलगी बाहेर पडली होती. घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे किराणा दुकान आहे. पण तिला घरी यायला तीन वाजतील, असं तिने तिच्या दाजींना फोन करुन कळवले होते. पण बराचवेळ झाला तरी ती परतली नाही, म्हणून तिला फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. गावात आणि मैत्रिणींकडे ही कुटुंबीयांनी विचारणा केली. मात्र तिचा शोध लागत नव्हता, मग गावालगत शोधमोहीम सुरु झाली. अखेर रात्री सातच्या सुमारास कॅनॉल शेजारी तिचा मृतदेह आढळून आला. डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करत तिची हत्या करण्यात आली होती. घरापासून काही अंतरावर असणाऱ्या किराणा मालाचे दुकान आहे. चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामाही केला. मुलीच्या कुटुंबियांकडून अधिकची माहिती घेतली. तेव्हा 2018 मध्ये मृत मुलीची छेडछाड झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावरच कुटुंबीयांनी संशय घेतला असून तिघांविरोधात हत्येचा गुन्हा ही दाखल केला होता.


अटकेतील तिघांची सुटका होणार
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी गृहखात्यावर निशाणा साधला होता. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. कुटुंबीयांनी संशय व्यक्त केलेल्या तिघांना पोलिसांनी अटकही केली. न्यायालयाने तिघा संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती. पण त्याचवेळी अन्य बाबींचा तपासही सुरुच होता. यात अल्पवयीन नातेवाईकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अटकेतील तिन्ही संशयितांना सोडण्याची प्रक्रिया सुरु केली होती.