पिंपरी चिंचवड : अध्यात्माचे पाठ देणाऱ्या महाराजानेच विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीनंतर हा विद्यार्थी तब्बल सात दिवस कोमात होता. पुण्यातील देवाच्या आळंदीत ही धक्कादायक घटना घडली आहे. भगवान पोव्हणे असं त्या महाभाग महाराजाचे नाव आहे. माऊली ज्ञानराज प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्थेतील हा महाराज आहे.
भगवान पोव्हणे याने 10 फेब्रुवारीला अकरा वर्षीय ओम चौधरीला हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याचा जाब विचारला आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली. त्याने ओम चौधरीच्या हात, पाय, पाठ आणि छातीवर काठीने प्रहार केला. छातीवरील काठी ही थेट हृदयावर लागली होती. तेव्हा ओमने ती कळ सहन केली, तशाच अवस्थेत भगवान महाराज त्याला औरंगाबादला घेऊन गेला. पण तिथे ओम बेशुद्ध पडला, याची माहिती मुलाच्या आईला देताना तो आजारी असल्याचं महाराजाने थाप मारली. तिथून त्याला पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयात आणलं गेलं.
ओमची आई त्याच रुग्णालयात साफसफाईचं काम करते, त्यामुळे कमी खर्चात इथेच उपचार होईल अशी त्यांची धारणा होती. 12 फेब्रुवारीच्या रात्री ओमवर तातडीने उपचार सुरु झाले, मात्र तो कोमात गेला होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अन् तब्बल सात दिवसांनी म्हणजेच 19 फेब्रुवारीला तो शुद्धीत आला. जीवदान मिळालेल्या ओमने घडला प्रकार आईला सांगितला आणि ही धक्कादायक बाब समोर आली.
ओमच्या छातीत पाणी झाल्याचं, तसेच रक्तस्त्राव होण्याची चिन्हही आहेत. याप्रकरणी महाराजावर आळंदी पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महाराजाच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहे. ओमची मात्र प्रकृती अद्याप ही चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्याला पिंपरीतील डॉ डी वाय पाटील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
ओमच्या वडिलांचे निधन झालंय, आई मजुरी करते, म्हणूनच ओमला देवाच्या आळंदी येथे अध्यात्मिक संस्थेत प्रवेश घेतला होता. पण आध्यत्मिक शिक्षण देणारा महाराजच त्याच्या जीवावर उठला. आता ओमच्या प्रकृतीसाठी मदतीची अपेक्षा आहे.
आळंदीत अध्यात्माचे पाठ देणाऱ्या महाराजाच्या मारहाणीनंतर विद्यार्थी कोमात
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
21 Feb 2020 10:15 AM (IST)
पुण्यातील देवाची आळंदीमध्ये आध्यात्मिक शिक्षण संस्थेतल्या एका महाराजाने विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. भगवान पोव्हणे असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे. हरीपाठ आणि अभ्यास करत नाही या कारणाने अवघ्या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी तब्बल सात दिवस कोमात होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -