पुणे : काँग्रेसमधील घराणेशाही आणि राहुल गांधींवर तुटून पडलेल्या शहजाद पुनावाला यांचे भाजपच्या नेत्यांशी निकटचे संबंध आहेत, आणि त्यामुळेच ते राहुल यांच्यावर टीका करत आहेत, असा आरोप काँग्रेसनं केला. त्यासाठी शहजाद पुनावाला यांचे भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटोही काँग्रेसनं व्हायरल केले आहेत.
राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला काँग्रेस नेते शहजाद पुनावाला यांना तीव्र विरोध दर्शवला होता. पुनावाला यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता. तसेच काल (सोमवारी) राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर, शहजाद पुनावालांनी काँग्रेससाठी हा दिवस काळा दिवस असल्याचं म्हटलं होतं.
तसेच, अपल्याला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात वरिष्ठ नेत्यांनी अडवल्याचा आरोपही पुनावाला यांनी केला होता. तसेच घराणेशाही वाचवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची धडपड सुरु असल्याचं पुनावाला म्हणाले होते.
यानंतर काँग्रेसकडून आज शहजाद पूनावाला यांचे काही फोटो जारी करण्यात आले असून, या फोटोंमध्ये ते भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, खासदार अमर साबळे, पुण्याच्या कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यासोबत दिसत आहेत.