PCMC Hires Transgenders: पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीयपंथीना मुख्य प्रवाहात आणण्याच ठरवलं आहे. त्या दिशेने पाऊल टाकत तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड करण्यात आली.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) तृतीय लिंग व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून स्वीकारले आहे. त्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे. शहरात पाच हजारांपेक्षा अधिक तृतीपंथी आहेत. बहुतांश तृतीयपंथ्यांकडे नागरिक वेगळ्यान नजरेने पाहतात. दुसरीकडे त्यांना सन्माने जगता, वावरत यावं म्हणून महानगरपालिकेने तृतीयपंथीसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.


सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झालेल्या तृतीयपंथीयांनी देखील समाधान व्यक्त करत पालिकेचे आभार मानले.
हा प्रकल्प सामाजिक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त तसेच प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले. भविष्यातही या बाबींचा विचार करून अशा नोकरीच्या संधी दिल्या जातील, असे आयुक्तांनी सांगितले आहे.


बहुतेक लोकांचा आमच्याकडे दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यांचा असा विश्वास आहे की आम्ही सेक्स वर्कर किंवा भिकारी आहोत. तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहून मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया रुजू झालेल्या निकीता यांनी दिली आहे.


मी 17 वर्षांपूर्वी साडी नेसली होती. जिथे आम्हाला निच वागणुक दिली जाते. आमचा सन्मान केला जात नाही तिथेच अशी नोकरीची संधी मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. महामंडळाने आम्हाला ही संधी दिली आहे. त्यामुळे आम्ही कायम ऋणी राहू, असं रुपाली म्हणाल्या.


देशात तृतीयपंथीयांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहे. अनेक क्षेत्रात त्यांच्यासाठी कशा पद्धतीने कार्य करता येईल याचं नियोजन सुरु आहे. वकील, डॉक्टर आणि खान्देशात तर नगरसेवक म्हणूनसुद्धा तृतीयपंथीयांना निवडून दिलं जात आहे. मात्र काही भागात अजूनही त्यांची अवहेलना केली जाते. त्यांना निच वागणूक दिली जाते. त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येक विभागाने द्यायला हवा. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज त्यांना रुजू करुन घेत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.