Manorama Khedkar: पुण्यातून वाशिम येथे बदली झालेल्या वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरसह(Pooja Khedkar) तिच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढत चालल्याचं दिसून येत आहे आहेत.  पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरवर देखील पौड पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता त्यांनी पुण्यातील त्यांच्या घरासमोर अतिक्रीमण केल्याचे पुढे आले असून या प्रकरणी त्यांना पुणे महानगर पालिकेने नोटिस बजावत हे अतिक्रमण ७ दिवसांत काढण्याचे आदेश दिले आहेत. या संपुर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पौड पोलिसांच एक पथक खेडकरांच्या घरी आज जाऊन आलं. अशी माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. 


वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची(Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरवर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचे एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पोलिस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.मनोरमा खेडकर यांनी दिवसांपुर्वी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांवर दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते पुन्हा परतले. त्यामुळे आता पोलिस पुढील काय कारवाई करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.


मनोरमा खेडकरला पुणे पोलिसांची नोटीस


पुणे पोलिसांनी बाणेर रोडवरील घराबाहेर मनोरमा खेडकरच्या नावे नोटीस लावली (IAS officer Pooja Khedkar) आहे. तिचा शस्त्र परवाना रद्द करण्याबद्दल ही नोटीस आहे. पुणे शहर पोलीसांकडून मनोरमा खेडकरला नोटीस बजावत तुमचे पिस्तूलाचे लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये असं या नोटीशीच्या माध्यमातून मनोरमा खेडकरला विचारण्यात आलं आहे. मनोरमा खेडकर विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानं पिस्तूलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. 


पूजा खेडकर ऑडी कार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात जमा 


पूजा खेडकर(Pooja Khedkar) वापरत असलेली ऑडी कार तिच्या कारचालकाने अचानक रात्री पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात नेऊन जमा केली आहे. या कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकरने आयएएस अधिकारी असल्याच दाखवलं होतं. अनेक सरकारी कार्यालयांत जाताना तिने ही कार वापरली होती. मात्र प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा तिला अधिकार नसल्याने पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली. दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरने बंगल्यात प्रवेश दिला नव्हता. मात्र काल रात्री ड्रायव्हरने गाडी पोलीसांकडे सोपवली आहे. या गाडीची कागदपत्रे पोलिसांकडे सोपविण्यात आलेली नाहीत असं पोलिसांच म्हणणं आहे.