अहमदनगर : अहमदनगरमधल्या कुरियर कार्यालयात ज्या पार्सलचा स्फोट झाला, ते पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे होतं, अशी माहिती आता समोर येत आहे. पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली आहे.


नगरच्या मारुती कुरिअर कार्यालयात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कर्मचारी कुरिअर फोडायचं काम करत होते. मात्र त्यातील एक पार्सल फोडत असताना त्याचा अचानक स्फोट झाला.

या पार्सलमध्ये असणाऱ्या स्पीकरच्या पाईपमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती. स्फोट झाल्यानंतर हे पाईपचे तुकडे संजय क्षीरसागर या कर्मचाऱ्याच्या हातात आणि पायात घुसले. सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट, दोन जण जखमी

हे पार्सल अहमदनगरहून पुण्याला पाठवलं जात होतं. मात्र यावर पाठवणाऱ्याचा पत्ता बनावट असल्याचं समजतं आहे. त्यामुळे पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीसोबत घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कुरिअर बॉक्समधे एक चिठ्ठी आढळून आली आहे, मात्र पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिला नाही.

चिठ्ठीत काय मजकूर?

मला तुम्ही जम्मू वरून आणले, शिकवले, माझ्या पायावर उभे केले, मी आभारी आहे . माझ्या आवाजात ते रेकॉर्ड केले आहे ते तुम्ही ऐका

आता हे पार्सल संजय नहार यांच्या नावे असल्याचं समोर आल्यानंतर पुण्याहून पोलिसांचं एक पथक तातडीने अहमदनगरला रवाना झालं आहे.