पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्यदलांकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन दिली आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलं?
शरद पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टद्वारे नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्याशी साधलेल्या संवादाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले...ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे. या बैठकीलाराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे सहभागी होतील.
भारतानं सतर्क राहावं : शरद पवार
भारतीय सैन्य दलांच्या ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या सोबत असल्याचं म्हटलं. गेल्या आठवड्यात जे काही काश्मीर मध्ये घडले त्यामुळे साहजिक देशात लोकांमध्ये एक अस्वस्थता होती. निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 26 लोक मारली गेली. भारत आणि पाकिस्तान यांमध्ये पीओके जो त्यांनी 48 मध्ये घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते, असं शरद पवार म्हणाले.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली आहे. काश्मीर मधील विधानसभेत हल्ल्याच्या विरोधात ठराव झाला, ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका दहशतवाद विरोधात घेतली, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी काल रात्री कारवाई झाली त्याच्या पाठी आम्ही उभे आहोत, असं म्हटलं. या हल्ल्याच्या नंतर अमेरिका, जपान आणि इतर देश यांनी भारताला समर्थन दिलं आहे. काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की चीन ने समर्थन दिलं नाही, त्यामुळं सतर्क राहण्याची स्थिती आहे. पाकिस्तान माहिती नाही पण त्यांना त्यांची ताकद आणि भारताची ताकद माहिती आहे. या गोष्टीत आपल्याला सावध रहावं लागेल. पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल हे धोरण चुकीचं नाही. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे जे नाव दिलं ते योग्य दिलं गेलं, असंही शरद पवार म्हणाले.