पुणे : कुठलाही स्वागत समारंभ असो, पुष्पगुच्छ देऊन एखाद्याचं स्वागत करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण आयपीएस संदीप पाटील यांनी आपल्या कृतीतून ही प्रथा मोडीत काढली. ‘स्वागताला येताना पुष्पगुच्छ नको तर पुस्तकं आणा,’ असं आवाहन स्वागताला येणाऱ्या लोकांना संदीप पाटील यांनी केलं. विशेष म्हणजे लोकांनीही पाटील यांच्या या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद दिला.
आयपीएस अधिकारी संदीप पाटील नुकतेच पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी रुजू झाले. ‘स्वागताला बुके नको, बुक्स आणा’, असं आवाहन पाटील यांनी नागरिकांना केलं आणि बघता बघता हजारो पुस्तकं जमा झाली. मिळालेली ही पुस्तकं गडचिरोली जिल्हातील नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थांना भेट दिली जाणार आहेत.
गडचिरोली जिल्हात नक्षलवादविरोधी कारवाईसाठी संदीप पाटील ओळखले जातात. पण पाटील यांची एवढीच ओळख पुरेशी नाही. अनाथ विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘अग्निपंख’ नावाची योजनी सुरु केली. तसंच पोलीस स्थानकात लायब्ररी सुरु करुन पोलिसांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे.
“याआधी 2016 साली साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारतानाही मी नागरिकांना आणि भेटायला येणाऱ्यांना असंच पुस्तकं भेट देण्याचं आवाहन केलं होतं. तेव्हा जमलेली जवळपास दहा हजार पुस्तके गडचिरोलीच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना भेट दिली,” असं ‘पुणे मिरर’सोबत बोलताना संदीप पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्यभरातील 84 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदावरुन संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
‘स्वागताला बुके नको, बुक द्या’, IPS संदीप पाटलांचा प्रेरणादायी पायंडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2018 01:45 PM (IST)
कुठलाही स्वागत समारंभ असो, पुष्पगुच्छ देऊन एखाद्याचं स्वागत करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण आयपीएस संदीप पाटील यांनी आपल्या कृतीतून ही प्रथा मोडीत काढली.
सौजन्य : IPS संदीप पाटील यांचं फेसबुक फॅन पेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -