‘येता जाता टपली मारतो’, मुलाने शेजाऱ्याची गाडी पेटवली
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2018 11:26 PM (IST)
शेजारी सतत टपली मारतो, याचा राग मनात ठेवून अल्पवयीन मुलाने शेजाऱ्याची गाडी पेटवली. या मुलाने रागाच्या भरात हा उपद्व्याप केला.
चिंचवड (पुणे) : शेजारी सतत टपली मारतो, याचा राग मनात ठेवून अल्पवयीन मुलाने शेजाऱ्याची गाडी पेटवली. या मुलाने रागाच्या भरात हा उपद्व्याप केला. लिंक पत्रा शेड परिसरात आज पहाटे चार दुचाकी जाळण्यात आल्या. दुचाकी पेटवणाऱ्या अल्पवयीन मुलाला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच मुलाने आधी एक सायकल चोरली होती. त्यामुळे सायकलच्या मालकाने या मुलाविरुद्ध तक्रार केली. सायकलचा मालक केवळ तक्रार करुन थांबला नाही, तर तेव्हापासून सायकल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला सतत शिवीगाळही करत होता. तसंच येता-जाता टपली मारत असे. याचाच राग डोक्यात ठेवून संबंधित मुलाने तक्रारदाराची गाडी पेटवली. तसंच शेजारी असणाऱ्या इतरही तीन दुचाकींना आग लावली.