Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक परस्परांशी भिडले. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात हा राडा झाला. या दोघांमध्ये फ्रीस्टाईल मारामारी झाली. ही मारहाण सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र रिक्षाचालक संतापला असल्याने भर चौकात राडा झाला. रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आली.


नेमकं काय घडलं?


नो एन्ट्रीमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाचा वाहतूक पोलिसांनी फोटो काढला. मात्र रिक्षात पत्नी बसलेली असताना दंड आकारला जातो आहे, त्यामुळे चालकाने वाहतूक पोलिसांना उद्देशून अपशब्द वापरले. तुम्ही अशा पावत्या फाडता म्हणूनच तुमचा मृत्यू होतो. सर्वांसमोर रिक्षाचालक असं म्हणताच वाहतूक पोलिस संतापले. याच रागातून वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकावर हात उचलला. रिक्षा चालकानेही प्रतिउत्तरात हात उचलला. दोघेही एकमेकांशी भिडले. रिक्षा चालक नशेत असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. असं असलं तरी वाहतूक पोलिसांना असं मारहाण करत, कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? असा ही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.


पाहा व्हिडीओ : 






पोलिसांना मारहाणीच्या दोन दिवसातील तिसरी घटना


पहिली घटना: पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करुन आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. 34 वर्षीय रामा कुंडलिक शिंदे असे या व्यक्तीचे नाव होतं. तो मूळचा उस्मानाबादचा असून तो अर्थमूव्हर मशिनरी ऑपरेटर म्हणून काम करतो. या प्रकरणी 48 वर्षीय हवालदार रामदास वाव्हळ यांनी तक्रार केली होती. भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत आणि सोमवारी पहाटे नाशिक फाटा येथे रात्रीच्या ड्युटीसाठी तैनात होते. 


दुसरी घटना: पुण्यातील धानोरीत भर रस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. चार-पाच जणांमध्ये गाडी काढण्यावरुन पोलिसांशी वाद होता. वाद शिगेला पोहचल्यानंतर हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीत पोलीस कर्मचारी यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रदीप मोटे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. एका व्यक्तीशी गाडी लावण्यावरुन वाद झाला. त्या व्यक्तीने गाडी बाजूला घे म्हणून पोलीस कर्मचारी मोटे यांना सांगितलं. याच वेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्या व्यक्तीने मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत ते जखमी झाले.