पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केलं आहे. तल्हा खान इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. 


या प्रकरणात जहानझीब वानी आणि त्याची बायको हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला मार्च 2020 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीत लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात 8 मार्च 2020 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने 20 मार्च 2020 रोजी या प्रकरणाची पुन्हा नोंद केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अब्दुल्ला बसीत, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीकी खत्री आणि अब्दुल रहमान या चौघांना अटक करण्यात आली होती. 




सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दीकी खत्री यांना जुलै 2020 मध्ये एनआयएने अटक केली होती. तल्हा खान हा नबील सिद्दीकी खत्रीच्या संपर्कात असल्याचं एनआयएला तपासात आढळून आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.


जहानझीब वानी आणि हिना बेग हे पुण्यातील व्यायामशाळा चालवणाऱ्या खत्री तसंच सादिया यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं. एनआयएने खत्रीवर भारतात हिंसक दहशतवादी हल्ले घडवण्यास मदत केल्याचा आरोप केला होता, तर सादियावर भारतात IS चे कॅडर तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याशिवाय वानी आणि बेग हे हैदराबादच्या अब्दुल्ला बासितच्या संपर्कात होते, ज्याला ISIS च्या अबू धाबी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती.


या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारसरणी पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट करुन हत्या करणे, यांसारखे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.