पुणे : पुण्यात रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे एका नवजात बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा दावा पालकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला रुबी हॉस्पिटलने केराची टोपली दाखवत चेक स्वीकारण्यास नकार दिला. तब्बल साडेतीन लाख एकरकमी रोख भरण्याची मागणी करत उपचार न केल्यामुळे आम्रपाली आणि गौरव खुंटे यांच्या नवजात मुलीनं प्राण सोडल्याचा आरोप आहे.

पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याला दोन दिवसांपूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र जन्मत:च या मुलीला हृदयाचा विकार होता. तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रियेची गरज होती. त्यामुळे गौरव खुंटे बाळाला घेऊन शनिवारी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला गेले.

रुबी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना साडेतीन लाख रुपये कॅश भरण्यास सांगण्यात आलं. खुंटेंनी दीड लाख रुपयांची रक्कम रोख स्वरुपात भरण्याची तयारी दाखवली. यामध्ये काही हजार पाचशेच्या नोटांचा समावेश होता. बाकीचे पैसे चेक स्वरुपात भरण्याची तयारी दाखवली. पण हॉस्पिटल नकार देत कॅश पेमेंटवर अडून बसले.

संध्याकाळी सहा वाजता बाळाची तब्येत बिघडली. तुम्ही खूप वेळ दवडल्यामुळे उशीर झाला, बाळाचे काही अवयव निकामी होत आहेत, असं सांगत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. तेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवलेलं बाळ रविवारी पहाटे बाळ दगावलं. रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळेच आपल्या बाळाचा जीव गेल्याचा आरोप आता खुंटे दाम्पत्य करत आहे.

गेल्या रविवारी 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास मुंबईतील जीवन ज्योत रुग्णालयाने नकार दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अशाचप्रकारे नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत रुग्णालयात उपचारासाठी चेक स्वीकारावे असे आदेश दिले होते. पण तरीही काही रुग्णालये याला केराची टोपली दाखवत असल्याचे समोर आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश काय?

तातडीच्या उपचाराप्रसंगी सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून चेक स्वीकारावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अमंलबजावणी व्हावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवले जाणार आहे.

रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबधित रुग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक घ्यावा. जेणेकरून त्यांना चेक स्वीकारण्याबाबत मदत होईल. त्याचबरोबर एखादया रूग्णाने उपचार घेतलेल्या रूग्णालयास दहा हजार रुपयांपर्यंतचा दिलेला चेक न वटल्यास या चेकची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या


500च्या नोटा नाकारल्यानं अर्भकानं जीव गमावला, डॉक्टरांनी आरोप फेटाळले


तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश


चेक बाऊन्स झाल्यास आम्ही 10 हजार देऊ : मुख्यमंत्री