पुणे : पुण्यात उघडलेली नवनवीन कॅफे हा आपल्या सगळ्यांच्याच चर्चेचाही विषय असतो. तिथलं इंटिरिअर... तिथे मिळणारं खाणं किंवा कॉफी ट्राय करायला अनेकजण उत्सुक असतात. तिथले अनुभव शेअर करुन आपल्या मित्र-मैत्रिणींना घेऊन तिथे जायचे प्लॅन्सही आखले जातात. पण पुण्याच्या लॉ कॉलेज रोडवर इतर मोठमोठ्या कॉफी शॉप्सच्या गर्दीत उभं राहिलंय, एक वेगळं कॅफे, म्युझिक कॅफे.

फूड आणि कॉफीसाठी ओळखली जाणारी कॅफे आपण नेहमीच बघतो. पण म्युझिक कॅफे त्या सगळ्या कॅफेपेक्षा खूप वेगळं आहे. भारतीय शास्त्रीय संगिताला वाहिलेलं हे कॅफे आहे. म्हणूनच अगदी साधेपणानं सजवलेल्या या कॅफेमध्ये जागोजागी वाद्य आणि संगीत या थीमवरचीच सजावट दिसते.



या कॅफेचं वेगळेपण असं की, इथे नुसताच टाईमपास करायला येऊन बसता येत नाही. म्युझिक, अर्थात भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायलाच याठिकाणी या असा आग्रह इथे आहे. इतकंच नाही, तर या कॅफेत तुम्हाला म्युझिक थेरपीही मिळते.



सकाळी 9 ते रात्री 9 सुरु असलेल्या या कॅफेमध्ये अक्षरश: संगीत रसिकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे इथे सगळ्या वयाची लोकं येतात. संगीत ऐकतात. सॅंडविच, कॉफी असं काही तरी चाखतात आणि फ्रेश होऊन घरी जातात.



डायबेटीस, बीपी, हार्टचं दुखणं बरं व्हावं म्हणून आपण औषधं घेतो. म्युझिक कॅफे मध्येही या सगळ्यावर औषधं दिली जातात. पण तो डोस कडू गोळ्यांचा नसतो, तर शास्त्रीय संगीताचा असतो.



संतोष घाटपांडे इथं आपली मेडिकल हिस्ट्री बघुन कुठल्या प्रकारची थेरपी द्यायची ते ठरवतात. शिवाय काऊन्सिलिंग ही करतात. त्यामुळे पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील या अनोख्या कॅफेला पुणेकरांची पसंती मिळते आहे