Supriya Sule : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांनी प्रतिक्रिया देणंही टाळलं होतं. त्यानंतर अजित पवारांवर नेमकी कोणती जबाबदारी असणार?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. "अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं पद हे मुख्यमंत्री समान असतं. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्यध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. यावरुन राज्याची जबाबदारी अजित पवारांवर असल्याचा अंदाज आहे.
कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर विरोधी पक्षात आणि सोशल मीडियावर घराणेशाहीबाबत चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात सगळीकडेच घराणेशाही आहे. या निवडीसंदर्भातदेखील घराणेशाही असून ती मान्य आहे. सोयीप्रमाणे लोकांना पवारांची घराणेशाही दिसते. मी शरद पवारांची मुलगी आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. एक बोट जेव्हा माझ्याकडे येतं तेव्हा बाकीचे बोट त्यांच्याकडे जातात त्यामुळे त्यांना आरोप करु द्या, असं त्यांनी विरोधकांना खडसावून सांगितलं .
... त्यावेळी माझे वडील आले नव्हते!
देशात संसदरत्न म्हणून मी अग्रेसर असते त्यावेळी विरोधकांना घराणेशाही दिसत नाही. संसदेत माझे वडील मला संसदरत्न म्हणून पास करत नाहीत. मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी संसदेत देशात पहिली येते असं नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या सोयीप्रमाणे घराणेशाही दिसते, असा टोला त्यांनी लगावला.
विरोधक टार्गेट का करतात?
अजित पवारांना डावललं, त्यांच्यावर अन्याय झाला, असा आरोपी विरोधी नेते करत आहेत. त्यावर सुप्रिया सुळेंनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. अजित पवारांचे मूड स्विंग फक्त विरोधकांना समजताता. त्यांना टीका करायला फार कोणी उरलं नाही त्यामुळे ते राष्ट्रवादी, मी आणि अजित पवारांना टार्गेट करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
रेल्वे अपघातातील मृत्यूची जबाबदारी कोणाची?
रेल्वे अपघातासंदर्भातील कॅगचा रिपोर्ट चिंताजनक आहे. ओडिशात झालेला रेल्वेचा अपघात हा रेल्वे मंत्रालयाने लक्ष न घातल्याने झाल्याचं कॅगचा रिपोर्ट सांगतो. या अपघातात 250 हून अधिक नागरिकांचा बळी गेला याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला हवी, असंही त्यांनी सांगितलं. सुरक्षेबाबत कधीही खबरदारी घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केंद्रावर केला आहे.