पुणे: निवृत्त आयपीएस मीरा बोरवणकरांनी (Meera Borwankar) अजित पवारांवर (Ajit Pawar) केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात असावा, भाजप (BJP) नेहमी ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण करते असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी केला. रोहित पवारांनी याप्रश्नी अजित पवारांची पाठराखण केल्याची चर्चा आहे. पिंपरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. 


रोहित पवार म्हणाले की, "ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण भाजपने सातत्याने केलं आहे. अजितदादांची लोकांमध्ये जी इमेज आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातंय. अचानक हा मुद्दा पुढे येणं, त्यावर लोकांमध्ये चर्चा होणं आणि अजित पवारांना उत्तर द्यावं लागणं हा त्याचाच भाग आहे का हे तपासावं लागेल. भाजपकडून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे."


निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून काही भाष्य केलं होतं. त्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना त्यांनी आपल्याला येरवडा जेलच्या परिसरातील जागा ही खासगी बिल्डरला द्यावी असं सांगितल्याचा आरोप केला आहे. त्या आरोपावरून गेल्या चार दिवसांपासून राज्यातील राजकारण मात्र चांगलंच तापल्याचं चित्र आहे. 


या आधी रोहित पवारांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आज बोलताना त्यांनी यामागे भाजपचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे येरवड्याच्या जमिनीवरून अजित पवारांवर होणाऱ्या आरोपावरून आमदार रोहित पवारांनी अजित पवारांची पाठराखण केल्याची चर्चा आहे. 


अजित पवारांचे स्पष्टीकरण


दरम्यान गेल्या चार दिवसांपासून केल्या जाणाऱ्या या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. आपण त्यावेळी पालकमंत्री होतो पण बोरवणकरांना तसा कोणताही आदेश दिला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच आपण कधीही चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे बोरवणकरांनी जे काही त्यांच्या पुस्तकात म्हटलंय त्याचा आपल्याशी काही संबंध नाही असं अजित पवाारांनी स्पष्ट केलं.


या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रं आपण नव्याने तपासली असून त्यामध्ये आपली कुठेच सही नसल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. कुणी काय म्हणावं याला आपण काही बंधनं घालू शकत नसल्याचंही ते म्हणाले.


ही बातमी वाचा: