फाटली म्हणून भाजपमध्ये गेलात का?, असा टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लगावला. गेल्या काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा नबाल मलिक यांनी समाचार घेतला आहे. पुण्याच्या मावळमध्ये अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक म्हणाले की, "हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपमध्ये गेलो म्हणून शांत झोप येते. फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेले का? बरं आता गेले ते गेले. आमच्यावर यंत्रणांचा वापर केला तरी महाविकास आघाडी सरकारला काही फरक पडत नाही. पण एक सांगतो आम्हाला शांत झोप येते आणि येणारच. पण तुमची झोप उडवून टाकू."
जाणीवपूर्वक अल्पसंख्याक खातं दिलं -
पवार साहेबांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्याक खातं हे माझ्याकडे दिलं. एक्साईज डिपार्टमेंट माझ्या दिलं जात होतं, पण ते मी नाकारलं. आमच्या धर्मात मद्यपानाला थारा नाही. रोज उठून तोच विषय समोर येणार, म्हणून मी हे खातं नाकारलं, असे मलिक म्हणाले.
समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, खुलं आव्हान देतो
समीर वानखेडेंना आव्हान देतो. वर्षभरात नोकरी जाईल. तुरुंगवास निश्चित आहे. राज्याचीही जनता हे पाहत आहे. बोगसगिरी जनतेसमोर आणणार.
हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते?
एका हॉटेलच्या उद्घाटनावेळी बोलताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये आल्यानंतर काय बदल झाला यावर बोलताना मिश्किल टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते. 'इथे आमदार साहेब मला म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय.'
राज्यात मागील दोन वर्षांपासू केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी आणि चौकशी सुरु केली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनाही चौकशीसाठी हजर बोलवण्यात आलं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील नेत्यांचा तपास सुरू केला. शरद पवार यांच्यापासून अनिल परब या सर्व नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चौकशीपासून बचाव करण्यासाठी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चाही उडाली होती.