बारामती : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी अशी यात्रा काढण्याऐवजी पाच वर्षापूर्वी सत्तेत आल्यावर यात्रा काढायला हवी होती, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
पाच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर अशी यात्रा काढली असती तर जनतेची काय कामे करायची आहेत, याचा अंदाज त्यांना आला असता. किंवा मधल्या काळात अशी यात्रा काढली असती तर आपल्या सरकारच्या कामाचं मुल्यमापन करता आलं असतं, अमोल कोल्हे म्हणाले. मात्र जनआशीर्वाद सारख्या यात्रा काढणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचंही त्यांनी म्हटलं.
शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे की काँग्रेस, राष्ट्रवादीने अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. मात्र भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्याचं आव्हान अजित पवार देऊनही त्यांनी कोणाचीही नावे जाहीर केली नाहीत, असं कोल्हे यांनी सांगितलं.
जनतेचा या सरकारकडून मोठा भ्रमनिरास झाला आहे. 2014 मध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणणारे तेच आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असं विचारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याऐवजी पवारसाहेब, अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे कोणीही पक्षांतर करणार नाही, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.