पिंपरी चिंचवड : पुण्यातील खेड तहसीलदारांची बदली होत नसल्याने सत्ताधारी आमदार दिलीप मोहिते हे चांगलेच हतबल झाले आहेत. पालकमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आणि विधानसभेत लक्षवेधी सूचना देऊनही आमदार मोहितेंना दाद मिळाली नाही. पण आता त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार सुचित्रा आमलेंच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची तक्रार दिली आहे. मात्र माझी बदली होत नसल्यानेच अशी तक्रार दिल्याचा दावा तहसीलदार आमले यांनी केला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर एका बदलीसाठी अशी वेळ आल्याचं बोललं जातं आहे.


पुण्यातील खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी खेड पोलिसांकडे रविवारी (9 ऑगस्ट) एक तक्रार दिली. खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या पतीपासून जीवाला धोका असल्याचं तक्रारीत नमूद आहे. तालुक्यातील तलाठी, सर्कल आणि शासकीय कर्मचारी नागरिकांना सहकार्य करत नसल्याचं, शिवाय अवास्तव मागणी करत असल्याचं, महसूल अधिकाऱ्यांवर तहसीलदारांचे नियंत्रण नसल्याचं, अवैध कामांना तहसीलदारांनी संरक्षण दिल्याचं, त्यांच्या कामचुकारपणामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप आमदारांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळेच पालकमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे त्यांच्या बदलीची मागणी केली, तसेच तालुक्यासाठी कार्यक्षम तहसीलदार देण्यासाठी लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला. शिवाय विधानसभेत लक्षवेधी सूचना ही मांडल्याचं आमदार मोहितेंनी तक्रारीत म्हटलं आहे.


तहसीलदार आणि त्यांचे पती बाळासाहेब आमले यामुळे माझ्यावर चिडून आहेत. ते विरोधकांना हाताशी धरुन माझी बदनामी करत आहेत. तसेच 'माझ्या बायकोची बदली केली, तर बघून घेईन' अशी धमकी ही दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. बाळासाहेब आमले यांचे गुंडांशी संबंध असल्याने, ते नवीन तहसीलदार येण्यापूर्वीच तालुक्यात दहशत माजवत आहेत. ते माझा घात-पात करण्याची दाट शक्यता आहे. माझ्या जीवाला काही धोका झाल्यास, त्यास बाळासाहेब आमले हेच जबाबदार असतील असं आमदार मोहिते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बाळासाहेब आमले आणि संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार मोहितेंनी तक्रारी अर्जाद्वारे मागणी केली आहे.



सुचित्रा आमले - तहसीलदार, खेड
माझी बदली होत नाही, त्यामुळे आमदारांनी अशी तक्रार केल्याचा दावा तहसीलदार सुचित्रा आमलेंनी केला आहे. मात्र आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे आम्ही असं कशाला करु? माझी नोकरी ही वारंवार बदली होणारीच आहे आणि काहीही झालं तरी ती बदली कोणी रोखू शकत नाही. माझ्या इथल्या कार्यकाळाला पावणे दोन वर्षे लोटले आहेत. त्यामुळे मुदतीपूर्वी बदली होऊ नये, म्हणून मी प्रशासकीय पातळीवर बदली थांबवण्याचे प्रयत्न करत आहे. माझ्या कुटुंबांचा या तक्रारीशी काडीमात्र संबंध नाही. मी गैरव्यवहार केला असेल तर माझे वरिष्ठ माझी चौकशी करतील. तेव्हा याबाबत मी सर्व खुलासा करेनच. मी गैरव्यवहार करत असते तर आज खेडमधील जनता माझ्या पाठिशी नसते, असं म्हणत आमलेंनी आरोपांचे खंडन केले.


संदीप पाटील - पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
खेड-आळंदी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी रविवारी खेड पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज दिलेला आहे. तहसीलदार सुचित्रा आमलेंच्या पतीकडून जीवाला धोका असल्याचं त्यात नमूद आहे. त्यानुसार आम्ही चौकशी करुन पुढील कार्यवाही करत आहोत.


राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीच्या सत्तेत आहे. पुणे जिल्ह्याचे सर्वस्वी निर्णय हे पालकमंत्री अजित पवार घेत आहेत. गृहखातंही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. असं असताना सत्ताधारी आमदारच असुरक्षित असल्याचं आणि त्यांच्या मागणीला दाद मिळत नसल्याचं यावरुन सिद्ध झालं आहे. एका तहसीलदारांच्या बदलीमुळे राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहितेंवर अशी वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.