Sharad Pawar on Ajit Pawar Meeting : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार सोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी (Sharad Pawar ) अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर अजित पवार आज सरकारमध्ये सामील झाले आहेत.
अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांना कल्पनाच नव्हती
अजित पवार नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती. आज सकाळी अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली होती. अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी काही वेळा पूर्वी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी शरद पवारांनी म्हटलं होतं की, मला आजच्या बैठकीचे नियोजन काय आहे माहिती नाहीत पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार असल्याचं ते म्हणाले. मात्र येत्या 6 जुलैला बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता बैठक होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, त्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
6 जुलैला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
ते म्हणाले की, अजित पवार यांच्या बैठका होतच असतात. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. पण 6 तारखेला महत्त्वाची बैठक होणार आहे. ती नेत्यांची बैठक आहे. मी नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या बैठकीत काय चर्चा होइल हे माहिती घेऊन सांगतो. सुप्रिया सुळे मुंबईवरुन पुण्याला यायला निघाल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपदाविषयी आणि त्या संदर्भात मी 6 तारखेला बैठक बोलावली आहे. ज्यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
'अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला दिल्लीला गेलो होतो'
शरद पवार पुढे म्हणाले की, अजित पवार दिल्लीला गेल्याच्या चर्चा झाल्या होत्या, त्यावेळी दिल्लीला मी पण गेलो ते पण गेले आणि जयंत पाटील पण गेले होते पण अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांना संघटनेत काम करण्याची इच्छा आहे, हे त्यांनी सगळ्यांसमोर जाहीर सभेत सांगितलं आहे. त्यावर विचार करु, असं देखील ते म्हणाले होते.
'पक्षाचे सगळे निर्णय मी एकटा घेत नाही'
पक्षाचे सगळे निर्णय मी एकटा घेत नाही. कोणताही निर्णय पक्षातील सगळे नेते मिळून घेत असतात. त्यामुळे 6 जुलैच्या बैठकीत हा निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष फुटू शकतो अशा चर्चा रंगाताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी फुटेल असं मला वाटत नसल्याचं पवार म्हणाले.
अजित पवारांकडून राजकारणात मोठा भूंकप
दरम्यान, पवारांची प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. त्यानंतर काहीच तासांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. अजित पवारांनी राजकारणाला कलाटणी दिली. शरद पवारांनी अल्टीमेटम न पाळल्यामुळे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता पवार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागेल.