इंदापूर : राष्ट्रावादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत चार ठिकाणी सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी भाजप सरकारच्या कारभारावर आणि धोरणांवर कडक शब्दात टीका केली.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 'एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा' या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "अशा प्रकारची उत्तरे देण्याचे कारण नाही. माझा चंद्रकांत पाटलांना प्रेमाचा सल्ला आहे, असं बोलू नका. चंद्रकांत पाटलांमध्ये सहनशीलता राहिली नाही. अनेक नवनवीन प्रश्न समोर उभे असतात, मात्र अशा प्रकारची टोकाची उत्तरं देऊन त्यातून काहीही साध्य होत नाही. अशी विधाने अपयशाच्या भावनेतून केलेली असून हे चुकीचे आहे, असंही अजित पवार म्हणाले.


काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, शेट्टी या सगळ्याचा समतोल करत कसं पुढे जायचं हे लक्षात येईल. पण यशस्वीपणे समतोल साधत आम्ही चार वर्ष पूर्ण केली. एक वर्षही पूर्ण होईल. पुन्हा निवडणूक जिंकू, पुन्हा शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर सदाभाऊ खोत, परत आले तर शेट्टीसाहेब सगळे एकत्र येऊ."


भारत बंदला राष्ट्रवादीचं समर्थन : अजित पवार
पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अमेरिकेसारख्या देशात पेट्रोल 45 रुपये प्रतिलीटर दराने विकले जाते. मात्र महाराष्ट्रात लवकरच हा दर शंभरी पार करणार आहे. पेट्रोलसोबत गॅसच्या दरानेही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.


इंधनांच्या दरवाढीचे अपयश भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला लपवता येणार नाही. गेल्या चार वर्षात अंदाजे 12 लाख कोटी रुपयांचा टॅक्स या सरकारने वसूल केला आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा टॅक्स सर्वसामान्यांची पिळवणूक करुन केंद्र सरकार व राज्य सरकार वसूल करत असेल तर ते चुकीचे असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच इंधन दरावाढीविरोधातील उद्याच्या 'भारत बंद'मध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.



संबंधित बातम्या 


एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल : पाटील


इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची 10 सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक