पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre) या मागील काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्याच पक्षातील महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला होता,चाकणकर आणि रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांच्या संघर्षानंतर ठोंबरेंना पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थ असलेल्या रुपाली ठोंबरे नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते, त्यानंतर आता ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्या अजित पवारांच्या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, तर पक्षाकडून काही गोष्टींची दखल घेतली जात नसल्याचंही त्यांनी एका मुलाखतीवेळी म्हटलं होतं.(Rupali Thombre) 

Continues below advertisement

Rupali Thombre Patil : ठोंबरेंची सोशल मिडीया पोस्ट काय?

रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंट फेसबुकवरती एक पोस्ट केली आहे,त्यामध्ये दोन फोटो देखील पोस्ट केलेले आहेत, त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये आपल्या विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला आहे.रुपाली ठोंबरे यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं की, "पहिला फोटो 2005 मधील आहे बरं का. तेव्हापासून समाजात, राजकारणात स्वतःच्या जीवावर मनगटाच्या ताकदीवर आणि कामाच्या जोरावर काम करण्यास सुरुवात केली. दुसरा फोटो महाराष्ट्रातील ज्येष्ठ, दिग्गज नेते, जबरदस्त आवडते नेते हिंदुह्रदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि मा. शरदचंद्र पवार साहेब. त्यामुळे आयरे गैरे नथू खैरे,नटरंगी लोकांनी शिकवू नयेच," असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे. या पोस्टनंतर आता रूपाली पाटील कोणता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा सुरू आहेत.

Continues below advertisement

Rupali Thombre Patil : दोन फोटोंवरून अनेकांनी लावले तर्क

रुपाली ठोंबरे यांनी पोस्टमध्ये शरद पवार यांच्यासोबत आपला एक फोटो पोस्ट केला आहे, तर दुसऱ्या फोटोत शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो आहे. दोन्ही फोटोत शरद पवार दिसत आहेत, त्यामुळे रुपाली ठोंबरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार का?, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तसंच या फोटोंमधून आणखी एक शक्यता वर्तवली जात आहे. 

त्याचबरोबर रुपाली ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात आहे. अशा स्थितीत त्यांनी आज सोशल मीडिया पोस्टमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर केल्यामुळे त्या शिवसेना प्रवेशाच्या तयारीत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या दोन फोटोवरून त्या शिवसेना शिंदे गटात किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याबाबतचे तर्क वितर्क लावले जात आहेत.