Pune, Ajit pawar : अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनल्यानंतर आपल्याला विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्य़ातील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केलाय. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केलीय आणि तसे निवेदन दिलेय. अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी तब्बल 800 कोटी रुपयांचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय.
पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी दबाव तंत्राचा वाटप करणारे अजित पवार पालकमंत्री बनल्यानंतर देखील आपल्याला डावलत असल्याचा आरोप भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या दहा सदस्यांनी केलाय. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी रितसर तक्रार करुन या सदस्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिलीय. यामुळे पुण्यातील महायुतीमधील धुसफुस पुन्हा चव्हाटय़ावर आलीय. खरं तर जिल्ह्यातील रस्ते, पाणी, समाज मंदिरे यासाख्या विकासकामांसाठी हा निधी वापरायचा असतो. मात्र गेल्या काही काळात मर्जीतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निधीचे वाटप करण्याचा प्रघात पडलाय. त्यातूनच महायुतीत वाद निर्माण झालाय .
अजित पवारांच्या आधी पुण्याच पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे होत. त्यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे रोजी झालेल्या बैठकीत 450 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील बहुतांश निधी भाजप आणि शिंदे गटातील सदस्यांनी सुचवलेल्या कांमाना मंजूर करण्यात आला होता. मात्र अजित पवार राज्य सरकारमधे सहभागी झाले आणि पुण्याच पालकमंत्रीपद त्यांनी चंद्रकांत पाटलांकडून अक्षरश हिसकावून घेतल. त्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांनी मंजूर केलेला निधी रोखून तर धरलाच त्याचबरोबर आपल्या मर्जीतील सदस्यांना तब्बल आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील फक्त दहा टक्के निधी आपल्याला मिळाल्याचा आरोप भाजपच्या या सदस्यांनी केलाय.
भाजप आणि शिंदे गटाच्या या दहा सदस्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करण्याची वेळ आलीय. या सदस्यांनी अजित पवारांच्या या दादागिरीची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे करुन पाहिली. मात्र पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना याबाबत विचारल्यावर चंद्रकांत पाटलांनी चक्क हातच जोडले . आपले नेतेच आपल्या पाठीशी उभा रहात नसल्याच पाहून भाजपच्या या सदस्यांनी विकास निधीबाबत न्यायालयात जायच ठरवलय. मात्र यातुन पुणे जिल्ह्य़ातील महायुतीमधील संघर्ष आणखी वाचण्याची शक्यताय.
लोकसभा निवडणुकीत मदत होईल या अपेक्षेनं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वान अजित पवारांना सत्तेत सहभागी करुन घेतलं. त्याची पुरेपूर किंमत अजित पवार वसुल करतायत. या आधी अजित पवारांच्या या दादागिरीचा अनुभव कॉंग्रेसने पंधरा वर्षं घेतला होता, आता तो भाजपला घ्यावा लागतोय. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा भाजपला खरच फायदा होईल का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे पण त्यांची दादागिरी मात्र भाजपच्या वाट्याला आतापासनूच यायला लागलीय.