एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार असल्याचं जाहीर आव्हान अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी दिलं आहे. पुण्याच्या मावळमध्ये अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. समीर वानखेडे यांनी कुणाच्या सांगण्यावरुन कारवाई केली? असा सवालही उपस्थित केलाय. पुण्यातील सभेत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, 'समीर वानखेडेंना आव्हान देतो. वर्षभरात नोकरी जाईल. तुरुंगवास निश्चित आहे. राज्याची जनता सध्या सुरु असलेलं सर्व पाहत आहे. समीर वानखेडेंची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करुन यात माझं काही नाही, असं म्हणाले. मग कुणाच्या सांगण्यावरुन कारवाई केली? उत्तर द्या. मी कुणालाही घाबरत नाही. समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही.'


समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी मीडिया घेऊन का गेले? चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. यात वानखेडे भाजप वाल्यांचा म्होरक्या आहे. बोगसगिरी करतोय, त्यामुळेच या बोगस केसेस आहेत. हे कोर्टात टिकणार नाहीत. येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समजलंय. ही तोडपाणी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.


जाणीवपूर्वक अल्पसंख्याक खातं दिलं -
पवार साहेबांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्याक खातं हे माझ्याकडे दिलं. एक्साईज डिपार्टमेंट माझ्या दिलं जात होतं, पण ते मी नाकारलं. आमच्या धर्मात मद्यपानाला थारा नाही. रोज उठून तोच विषय समोर येणार, म्हणून मी हे खातं नाकारलं, असे मलिक म्हणाले.


फाटली म्हणून भाजपमध्ये गेलात का?
फाटली म्हणून भाजपमध्ये गेलात का?, असा टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लगावला. गेल्या काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा नबाल मलिक यांनी समाचार घेतला आहे. पुण्याच्या मावळमध्ये अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक म्हणाले की, "हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपमध्ये गेलो म्हणून शांत झोप येते. फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेले का? बरं आता गेले ते गेले. आमच्यावर यंत्रणांचा वापर केला तरी महाविकास आघाडी सरकारला काही फरक पडत नाही. पण एक सांगतो आम्हाला शांत झोप येते आणि येणारच. पण तुमची झोप उडवून टाकू."