Narendra Dabholkar Case :  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar Case ) यांच्या हत्येचा खटला पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरु आहे.  सनातन संस्थेच्या पाच जणांविरुद्ध याबाबत आरोप निश्चित करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस.आर. सिंग यांनी न्यायालयात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी दाभोलकरांची हत्या कशी केली हे न्यायालयात सांगितलं आहे.


कसा होता घटनाक्रम?



1- 20 जून 2013  औरंगाबादहून मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकात पोहोचले. तिथून ते शनिवार पेठेतील एका घरात आले.  तिथे एक मोटार सायकल त्यांच्यासाठी तैनात ठेवण्यात आली होती. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ज्या इमारतीत राहायचे तिथली पाहणी केली. साधना मीडिया सेंटरच्या समोरच ही इमारत आहे. या इमारतीतून डॉक्टर दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी निघाले आणि पाठोपाठ त्यांचे मारेकरीही निघाले होते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पुण्यातील या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. त्यांचे मारेकरी पाठोपाठ या शनिवार पेठ पोलीस चौकीसमोर येऊन दबा धरुन बसले. डॉक्टर दाभोलकर या पुलावरुन परत जाण्याची ते वाट बघत होते. 


सफाई कामगारांची साक्ष महत्वाची ठरली...


डॉक्टर दाभोलकर पुलावर आले होते त्यानंतर मारेकरी  सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पुढे सरसावले आणि त्यांनी डॉक्टर दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आणि लगेचच ते मोटर सायकलवरुन पसार झाले. पण हे सगळं सकाळच्या वेळी इथे स्वच्छता करणाऱ्या दोन सफाई कामगारांनी पाहिलं आणि त्यांची या प्रकरणातील साक्षच या प्रकरणात निर्णायक ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर, विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आलेत. 



शिक्षा कधी होणार?


माजी सीबीआय ऑफिसर एस आर सिंग यांनी हत्येच्या दिवशीचा दिनक्रम मांडला. डॉ. विरेंद्र सिंह तावडे आणि दाभोळकर यांच्यात वैचारिक मतभेद होते, असं त्यांनी सांगितलं.  डॉक्टर दाभोलकरांची हत्या होऊन जवळपास दहा वर्षं उलटली आहेत. या दहा वर्षांत फक्त आरोपींना पकडून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि त्यामुळेच हा खटला चालून त्याचा निकाल लागून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार?हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.