पुणे: बीड प्रकरणामध्ये पडणं आणि मंत्री धनंजय मुंडे यांची बाजु घेणं नामदेव शास्त्री यांच्यासाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांचे पुण्यातील कीर्तन अखेर रद्द करण्यात आलं आहे. येत्या 7 फेब्रुवारीला देहूतील भंडारा डोंगरावर शास्त्री महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अखिल मराठा समाजाने या कीर्तनाला विरोध दर्शवत, भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे कीर्तन रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीला दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार होती. विरोध झुगारून शास्त्री महाराजांचे कीर्तन झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही भंडारा डोंगर समितीला कळवले. हे पाहता भंडारा डोंगर समितीने अखेर नामदेव शास्त्री महाराजांचे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 7 फेब्रुवारीला डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचं कीर्तन होईल. असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं आहे.
प्रसिद्धी पत्रकामध्ये काय लिहलंय?
सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे साजरा होत असलेल्या माघ शुद्ध दशमी सप्ताह सोहळा २०२५ मध्ये भाविकांच्या मागणीवरून माघ शुद्ध दशमी च्या मुख्य दिवशी भगवानगडाचे महंत ज्ञायाचार्य हभप. श्री. डॉ. नामदेव महाराज शास्त्री सानप यांची कीर्तनसेवा आयोजित केली होती. परंतु सद्धपरीस्थितीचा विचार करून, अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांचे विनंती पत्रावरून व तळेगाव MIDC पोलिस ठाणे, नवलाख उंबरे, ता. मावळ, जि. पुणे यांचे समजपत्राचा विचार करून भंडारा डोंगर विश्वस्थ मंडळाने, भगवानगड येथील हभप. श्री. डॉ. नामदेव महाराज शाखी सानप, यांचे सहकारी हभप.श्री. विष्णुपंत खेडकर यांच्याशी विचारविनिमय करून दिनांक. ७.२.२०२५ रोजी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे होणारी कीर्तनसेवा स्थगित केली आहे.सदर दिवशी हभप. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांची कीर्तनसेवा आयोजित केली आहे.
विरोध दर्शवणाऱ्या पत्रात काय लिहलंय?
सदर कार्यक्रमाकरीता दिनांक ०७/०२/२०२५ रोजी ह.भ.प. न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री (भगवानगड) यांचे किर्तनरुपी सेवेचे आयोजन आपणा कडुन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रभर चर्चेत • असलेल्या मस्साजोगचे कै. संतोष देशमुख यांचेखुन प्रकरणात सदरगुन्हयातील अटक आरोपीची ह.भ.प. न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री (भगवानगड) यांनी पाठराखण करून मराठा समाजाच्या भावना दुखवतील असे वक्तव्य केल्याने सकल मराठा समाज नाराज झालेला आहे. सदर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी हे नाराज झाल्याने समस्त मराठा समाजाचे वतीने दिनांक ०७/०२/२०२५ रोजी होणारा ह.भ.प. न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री (भगवानगड) यांचे किर्तनरुपी कार्यक्रमास जोरदार विरोध दर्शविणार असल्याची गोपनिय माहिती इकडील पोलीस ठाणेस प्राप्त झाली आहे.
सदर कार्यक्रमास सकल मराठा समाजाकडुन विरोध शक्यता नाकरता येत नाही. सदरकिर्तनरुपी कार्यक्रम झाल्यास कार्यक्रम ठिकाणी मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते एकत्र येवुन एक मराठालाख मराठा अशी घोषणाबाजी करुन नामदेव महाराज शास्त्री यांचे तोंडाला काळे फासण्याची शक्यता असुन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होवु शकतो अशी खात्रीशीर गोपनिय माहिती पोलीस ठाण्यास प्राप्त झाली आहे.
तरी आपण सदर संबधाने सकल मराठा समाज व ह.भ.प नामदेव महाराज शास्त्री यांच्यात समन्वय साधुन सदरबाबत योग्यतो निर्णय घ्यावा. आपल्या ट्रस्ट कडुन सदर विरोधाची पर्वा न करता कार्यक्रम घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदरबाबत आपण योग्यतो निर्णय घेवुन वेळेप्रसंगी सदरचा कार्यक्रम रद्द करावा. याद्वारे आपणास समज. देण्यात येत की, आपणास समजपत्राव्दारे समज देयुनही आपण कार्यक्रम आयोजीत केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ट्रस्ट चे पदाधिकारी यांची राहील याची आपण नोंद घ्यावी.
कोण आहेत नामदेव शास्त्री?
नामदेव शास्त्री हे अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील भगवान गडाचे महंत आहेत. भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान मानलं जातं. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर फक्त मराठवाडाच नाही तर राज्यभरातून भाविकांची गर्दी होते. भगवानबाबांच्या निधनानंतर महंत भीमसिंह महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं, भीमसिंह महाराजांच्या नंतर आता महंत नामदेव शास्त्री महाराज या गादीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
नामदेव शास्त्रींनी न्यायाचार्य या पदवीसाठी मुंबई, आळंदी येथे शिक्षण घेऊन एम. ए. पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी भगवान गडाची गादी सांभाळली. 2016 साली पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात झालेला मोठा संघर्ष आजही चर्चेचा विषय आहे. भगवानगडावरुन राजकीय भाष्य नको असं म्हणत नामदेव शास्त्रींनी त्यावेळी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला विरोध केलेला होता. शेवटी पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यायला लागला होता. 2017 ला पंकजा मुंडेंनी भगवानबाबांचं गाव असलेल्या बीडच्या सावरगावात दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती, भगवान भक्तीगड असं त्यांनी त्यांचं नामकरण केलं.