पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केलं. यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याबद्दलच्या सर्व आठवणींना उजाळा दिलाच, पण त्याचबरोबर राज्य सरकारच्या नियोजनावरही बोट ठेवलं. यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी उत्तर भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आपण चंद्रकांत पाटलांना कोणतीही क्लिप पाठवलेली नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना माझ्या भूमिका स्पष्ट आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. 

बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावला नाही : राज ठाकरे 

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी फक्त खरं तेच सांगितलं. त्यांनी दंतकथा मांडल्या नाहीत. मी लहानपणापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत आलो आहे. त्यांनी त्यांच्या लिखाणातून फक्त सत्य मांडलं आहे. त्यांनी कधीही इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी दंतकथा सांगितल्या नाहीत. जेव्हा दंतकथा असतील, त्यावेळी ते तसा उल्लेख करत होते की, या दंतकथा आहेत. त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये कधीच दंतकथांचा शिरकाव होऊ दिला नाही. त्यांच्या कोणत्याही शिवचरित्रामध्ये तुम्हाला कधीच घोरपडीचा किस्सा दिसणार नाही. दंतकथा या ऐकायला छान असतात, पण त्यांचा इतिहासाशी काही संबंध नसतो."

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "ज्यांना जातीवरुन मतदान हवं आहे, त्यांनी केलेल्या या गोष्टी आहेत. ज्यांना जातीभेद पेरायचा आहे, त्यांनी स्वतः काही वाचायचं नाही आणि अशा गोष्टी पसरवायच्या, जातीभेद पसरवून आपली पोटं भरायची. त्यांच्याकडे बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणंच योग्य होतं."

मी चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवलेली नाही : राज ठाकरे 

"मी चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवलेली नाही. मी त्यांना बोललो होतो क्लिप पाठवीन पण त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली मला कल्पना नाही. मी जे असतं तेच बलतो. मी त्यांना विचारणार आहे की, क्लिप कोणी पाठवली. त्यादिवशी ते नाशिकला मला ज्यावेळी भेटले, त्यावेळी इतर विषयांसोबत हा देखील एक विषय निघाला. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, मुळात माझं ते भाषण हिंदीतून होतं. ते त्यांना कळालं, तुम्हाला अजून नाही कळालं. तुम्हाला जर अजून कळालं नसेल, तर मी काय बोललो हे पाठवून देईन. त्यावेळी तेही म्हणाले की, नक्की पाठव मला ऐकायला आवडेल."

माझ्या भूमिका स्पष्ट : राज ठाकरे 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "भूमिका काय स्पष्ट करणार? माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. आजपर्यंत मी ज्या भूमिका मांडल्या, त्या स्पष्ट आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. देशहिताच्याही गोष्टी मी मांडल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्यानं आपापली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे? तुम्ही आमच्यावर आक्रमण करु नका, आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाही. आसाम आणि मिझोरममध्ये जर पाहिलं, तर तिकडेही तेच सुरु आहे. मूळ प्रश्न असे निर्माण का होता? याही गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे."