पुणे : धावत्या बसमध्ये तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाच्या बहिणीने आपले अश्लील फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचाच राग धरुन अजित कान्हूरकर या तरुणाने तक्रारदार तरुणीच्या भावाची हत्या केली.
पीडित तरुणाच्या बहिणीने 8 जूनला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती आणि त्यानंतर गुन्हा देखील झाला होता. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक केली नव्हती. बहिणीचे फोटो पोस्ट करणाऱ्या अजित कान्हूरकरनेच हत्या केल्याचं समोर आलं आहे.
अजित कान्हूरकर आणि पीडित तरुण हे खेडच्या दावडी गावात राहणारे आहेत. अजितने पीडित तरुणाच्या बहिणीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांपासून अजित आणि पीडिताच्या बहिणीचे प्रेमसंबंधही होते. दोघेही पुण्यात इंजिनियरिंगचं स्वतंत्र महाविद्यालयात शिक्षण घेतात.
विवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने अजितने त्या मुलीचे अश्लील फोटो आणि खाजगी मेसेज फेसबुकवर पोस्ट केले. याप्रकरणी 8 जूनला मुलीने खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी या तक्रारीला गांभीर्याने घेतलं नसल्याचा आरोप आहे.
तक्रार दाखल केल्यामुळे अजित संतापला. त्याने फेसबुकवर पुन्हा "माफ कर दो भाईलोग, बहुत तडफा हू. मेरी तरफ से भी सोच लो, उसको भी तडपणा चाहीये." असा मजकूर टाकला.
त्यानंतर काही वेळाने त्याने बसकडे आगेकूच केली. सकाळी सव्वा सात वाजता आधी अजित बसला, नंतर खेडला महाविद्यालयात जाण्यासाठी मृतक चढला, मृतक गाडीत बसताच काही वेळात कोयत्याने त्याच्या डोकं, मान आणि डोळ्यावर हल्ला चढवला.
अजितचं रौद्ररुप पाहून बसमधील एकाही प्रवाशाने मध्यस्थी केली नाही. त्यामुळे हत्या करून तो पसार होऊ शकला. त्यानंतर जमावाने बस थेट खेड पोलीस स्टेशनला आणली.
वातावरण तणावाचं झालं होतं. पोलिसांनी 8 जूनच्या तक्रारीनंतर हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पोलिसांनी अजितच्या शोधासाठी चार पथकं रवाना केली आहेत.
पुण्यातल्या खेड तालुक्यात धावत्या बसमध्ये तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jun 2018 05:53 PM (IST)
हत्या झालेल्या तरुणाच्या बहिणीने आपले अश्लील फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचाच राग धरुन अजित कान्हूरकर या तरुणाने तक्रारदार तरुणीच्या भावाची हत्या केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -