Pune Crime News: क्षुल्लक कारणावरून टॉवेलने गळा आवळून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील धायरी परिसरातील युनिक फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात ही घटना घडली आहे. अजिंक्य सुरेश गुळमिरे असं 35 वर्षीय  हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 21 वर्षीय आरोपी सौरभ गणेश सावळे याला अटक करण्यात आली आहे. 


मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही व्यसनी होते. दोघांनाही प्रचंड दारु पिण्याचं व्यसन होतं.  दोघांनाही याच महिन्यात दारु सोडण्यासाठी धायरी परिसरातील युनिक फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. गेले काही दिवस दोघांमध्ये किरकोळ वाद सुरु आहेत. काल पहाटेही त्यांच्यात चांगली वादावादी झाली होती. काल सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टॉयलेटला कोण आधी जाणार यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने जवळ असलेल्या टॉवेलने गळा आवळून हत्या केली. 


व्यसनमुक्ती केंद्रात भीतीचं वातावरण
सिंहगड रोडवरील धायरी परिसरातील युनिक फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात ही धक्कादायक घडली आहे. गेले अनेक वर्ष या केंद्रात अनेकांना व्यसनमुक्त केलं आहे. मात्र या घटनेमुळे केंद्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोघाच्या वादातून झालेली ही हत्या अनेकांना गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करु शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


दहा दिवसात दुसरी हत्या
पुण्यात हत्येचं सत्र सुरु आहे. एकामागे एक वेगवेगळ्या मार्गाने केलेल्या हत्येची प्रकरणं समोर येत आहे. या पुर्वी कचरावेचक कर्मचाऱ्याची पहाटे हत्या करण्यात आली होती. कचरा वेचक तरुणावर पहाटेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. पुण्यातील चंदन नगर जवळील खराडी परिसरात पहाटे ही घटना घडल्याने सगळ्या परिसरात खळबळ उडाली होती. खराडीतील एकनाथ पठारे या वस्तीत राहणारा तरुण पहाटेच्या सुमारास कमाला जात असताना दोन अज्ञात तरुणांची त्याचा पाठलाग करत त्यांच्या भर रस्त्यात गोळीबार केला. गोळीबार केल्यावर दोघे अज्ञात तरुण फरार झाले होते. 27 वर्षीय अक्षय प्रकाश भीसे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव होतं. तो पुणे महापालिकेत कचरा वेचायचं काम करायचा. रोज प्रमाणे ते सकाळी कामासाठी निघाला होता. डम्पिंग स्टेशनकडे जात असताना त्याच्यावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला.