Deepak Kesarkar In Pune:  भाजप आणि शिवसेना एकत्र आहोत. मुंबई महापालिकेत आमचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकणार आहोत. त्यासोबतच सगळ्या नगरपालिकांसोबतच जिल्हापरिषदेच्या निवडणुकादेखील आम्ही जिंकू, असा विश्वास मंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते.


यंदाच्या दसरा मेळावा कोण करेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या विचारासाठी त्यांनी लढा दिला, तसाच त्यांची दसऱ्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी ही ते कटिबद्ध आहेत. परंतु याबाबत काय करायचं याचा मुख्यमंत्री निर्णय घेतील. यामध्ये मुख्यमंत्री कोणतं राजकारण ते येऊ देणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं आहे. दसरा मेळाव्याचं श्रेय घेण्यासाठी हा प्रयत्न नसेल तर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांबद्दल असलेला आदर, त्यांनी घेतलेली भूमिका आणि हिंदूत्ववाद मांडताना व्यापक हिन्दूत्ववाद मांडतो. त्यामुळे हेच तत्व पुढे नेण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत, असं मत देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


 न्यायालयाच्या प्रक्रियेवर बोलाण्यास नकार


महाराष्ट्राला जे सरकार मिळालंय त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं, असं गणपती बाप्पांकडे साकडं घालतो. न्यायालयाचे निकाल न्यायालय देत असतं. आज निकाल नाही प्रक्रिया सुरु आहे. लोकशाही कशापद्धतीने मजबूत होईल, यावर न्यायालय योग्य निर्णय देत असतं. मात्र न्यायालय प्रक्रियेवर भाष्य करू नये. सरन्यायाधिशांनी सांगितलं आहे की मीडिया ट्रायल घेऊ नये. त्यामुळे आम्ही या कोर्टाच्या निर्णयावर किंवा न्यायालयीन प्रक्रियेवर कोणतंही भाष्य न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.


 मुख्यमंत्र्यांचा खासदार मुलाच्या जागी भाजपचा दावा
 कोणी कशावर दावा करावा, हे प्रत्येकाच्या मनावर असतं. दावा करणं म्हणजे निवडून येणं नाही. हे लक्षात असू द्या. शिवसेना-भाजप अशी अभेद्य युती होती, त्यानंतर मिशन 151 कोणी काढलं? हे सर्वांना माहीत आहे. समोरच्या लोकांना, जनतेला दुखवायचं. जनतेच्या समोर हिंदुत्व म्हणून जायचं आणि नंतर सत्तेसाठी निष्ठा बदलायची. हे महाराष्ट्राच्या जनतेने कदापि सहन केली नसते. त्यामुळं आम्ही जनतेसाठी काम करतो आहोत. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. राज्याची प्रगती खुंटलेली होती त्यावर आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्राचं दैदीप्यमान संस्कृती होती. विकास होता तो विकास आम्हाला पुन्हा करायचा आहे.आम्हाला जे करायचं ते जनतेसाठी करायचं आहे, अजिबात राजकारण करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.