पुणे: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे अनेक मार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वर मोठी वाहतूक (Mumbai-Pune Expressway Traffic) कोंडी झाली आहे. मुंबईहुन पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लेन वर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना ह्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.
दोन दिवस लागोपाठ मिळणाऱ्या सुट्ट्या आणि गणेशोत्सव या कारणाने अनेक नागरिक आपल्या गावी- फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालल्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway Traffic) वरती मोठा ताण निर्माण झाला आहे. बोरघाट पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई हून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेन वरून वाहतूक सुरू करून ही कोंडी फोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway Traffic) वरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहेत. सकाळच्या वेळी निघालेले नागरिक मोठ्या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत.
साताऱ्यातील खंबाटकी घाटात वाहतूक विस्कळीत
साताऱ्यातील खंबाटकी घाटात वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. खंबाटकी घाट चढत असतानाच घाटात दोन ट्रक बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी (Traffic) निर्माण झाली आहे. अर्धातासापासून या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटात दोन किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.घटनास्थळी पोलिस आणि क्रेन दाखल झाले आहे, वाबतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड ,लोणेरे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं चित्र आहे. सकाळपासून महामार्गावर वाहनांच्या लांब रांगाच रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून लाखो गणेश भक्त कोकणात गावी जाण्यासाठी निघाले आहेत, मात्र त्यांना या मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर मुंबई गोवा हायवेवर रिमझिम पावसाच्या सरी सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
घोडबंदर रोडवर एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर
घोडबंदर रोडवर एस.टी बसचा अपघात झाल्याची माहिती आहे. एस.टी बस थेट पुलाच्या दुभाजकावर चढल्याची माहिती आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर ही घटना घडली आहे. ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. नंदुरबार आगारातील ही बस होती. अपघातावेळी एस.टी. मध्ये प्रवाशी नसल्याची माहिती आहे. तर या एसटी बसमधील चालक आणि वाहक सुखरूप असल्याची माहिती आहे.